बेळगाव लाईव्ह :पश्चिम बंगालमधील हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला तात्काळ आळा घालून त्यांना संरक्षण दिले जावे आणि हे जर तेथील सरकारला जमत नसेल तर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल बेळगावतर्फे राष्ट्रपतींकडे करण्यात आली.
विश्व हिंदू परिषद व बजरंग दल बेळगावचे विजय जाधव, आनंद कर्लिंगन्नावर संतोष मादीगर आदींच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज शनिवारी सकाळी राष्ट्रपतींकडे धाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. वक्फ कायद्यातील दुरुस्ती -सुधारणेच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार केला जात आहे. या हिंसाचाराच्या माध्यमातून हिंदू लोकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार केला जात आहे. परिणामी जीवाच्या भीतीपोटी तेथील हिंदूंवर आपले घरदार सोडून अन्यत्र सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याची वेळ आली आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन येथील हिंदूंना युद्धपातळीवर संरक्षण दिले जावे. येथील ममता बॅनर्जी यांचे सरकार भारताच्या संविधानाला बाधा पोचवत आपली होट बँक वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते.
पश्चिम बंगालमधील सध्या राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आहे. तेव्हा तेथील कायदा व सुव्यवस्था केंद्र सरकारने आपल्या हातात घ्यावी. अथवा तेथील सरकार जर हिंदूंचे संरक्षण करण्यात असमर्थ ठरत असेल त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांची बोलताना बजरंग दलाचे नेते विजय जाधव म्हणाले की भारत देश हा हिंदू प्रधान देश असला तरी या देशात हिंदूंवरच अमानुष अन्याय, अत्याचार होत आहेत. याचे उदाहरण म्हणजे सध्या पश्चिम बंगाल, मुर्शिदाबादमध्ये हिंदूंविरुद्ध सुरू असलेला हिंसाचार होय. सदर हिंसाचार पाहता पश्चिम बंगाल भारताचा भाग आहे की पाकिस्तानचा? अशी शंका येते. तेथील हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करून त्याला पळवून लावले जात आहे हिंदूंचे हे पलायन थांबावे आणि त्यांना संरक्षण मिळावे तसेच समस्त हिंदूंनी संघटित व्हावे या हेतूने आज आम्ही जिल्हाधिकारी व राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन धाडले आहे.
पश्चिम बंगाल सरकारला जर आपल्या राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणून हिंदूंना संरक्षण देता येत नसेल तर त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी आम्ही विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे केली आहे असे सांगून या पद्धतीने विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या प्रत्येक जिल्हा केंद्रातर्फे राष्ट्रपतींना निवेदन धाडण्यात येत आहे, अशी माहिती जाधव यांनी दिली. याप्रसंगी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
