बेळगाव लाईव्ह :प्रॉफिट ऑफ मार्जिन अर्थात विक्रीतील नफ्याचे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत वाढवून द्यावे, दारूचे दर कमी करावेत अशा विविध मागण्यांचे निवेदन आज बेळगाव लिकर मर्चंट असोसिएशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
बेळगाव लिकर मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील दारू दुकानदारांनी आज शुक्रवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे आश्वासन दिले. दारू दुकानदारांना विक्रीतील नफा फक्त 10 टक्के दिला जात असल्यामुळे त्यातून खर्चही निघत नाही.
यासाठी हा नफा 20 टक्क्यापर्यंत वाढवून द्यावा. दारू दुकानांमध्ये तोंडी लावण्याचा खाद्यपदार्थांच्या विक्रीस आणि पार्सल सेवेला परवानगी द्यावी. सरकारने दारूचे दर निम्मे करावेत वगैरे मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना बेळगाव लिकर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश हलगेकर यांनी सांगितले की, आम्ही आज एका निवेदनाद्वारे प्रॉफिट ऑफ मार्जिन वाढवून देण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कारण पूर्वी 20 टक्के असणारे प्रॉफिट ऑफ मार्जिन सरकारने 10 टक्क्यावर आणून ठेवले आहे.
इतक्या अल्प नफ्यातून आमचा खर्च भागत नाही. तेंव्हा विक्रीतील नफ्याचे प्रमाण 20 टक्क्यापर्यंत वाढवून देण्याची मागणी आम्ही केली आहे. त्याचप्रमाणे अन्य एका निवेदनाद्वारे वाईन शॉपमध्ये स्नॅक्स बार आणि पार्सल सेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बेळगावच्या सीमेवरील महाराष्ट्र राज्यांमध्ये दारूचे दर कमी असून आपल्याकडील तर त्याच्या दुप्पट आहेत.
तेंव्हा सरकारने याप्रकरणी लक्ष घालून सध्याचे दारूचे दर किफायतशीर म्हणजे निम्मे करावेत. याखेरीज सणासुदीला शेजारील गोवा राज्यातील दारू मोठ्या प्रमाणात बेळगावात आणली जाते. परिणामी शहरातील परवानाधारक दारू दुकानदारांच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम होत असल्यामुळे याकडेही लक्ष दिले जावे. तसेच मिलिटरी कॅन्टीन मधील दारू विक्री देखील नियंत्रणात ठेवली जावी, अशी विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केली असल्याचे गणेश हरगेकर यांनी सांगितले.