बेळगाव लाईव्ह :शिवबसवनगर, बेळगाव येथील श्री ज्योतिबा मंदिरामध्ये येत्या शनिवार दि. 12 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या चैत्र यात्रेची जय्यत तयारी करण्यात येत असून यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिरामध्ये येत्या शनिवार दि. 12 रोजी सकाळी 6 वाजता महाअभिषेक होणार असून त्यानंतर दवना अर्पण, पाद्यपूजा, अलंकार पूजा व आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
याखेरीज चैत्र यात्रेनिमित्त गुरुवार दि. 17 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात बेळगाव लाईव्हला माहिती देताना श्री ज्योतिबा मंदिराचे पुजारी लक्ष्मण प्रभाकर गुणे म्हणाले की, चैत्र-यात्रेनिमित्त पहाटे 6 वाजता मंदिर भाविकांसाठी खुले केले जाईल. त्यानंतर देवाचा महाअभिषेक होऊन श्री देवांची श्री दख्खनचा राजा अवतारातील अलंकारिक पूजा बांधली जाईल.
देवाला महा नैवेद्य अर्पण केल्यानंतर दिवसभर श्री ज्योतिबा मंदिर भक्तांसाठी दर्शनाकरिता खुले ठेवले जाणार आहे. त्या दिवशी संध्याकाळी मंदिरात महाआरती होऊन प्रसाद वाटप केले जाईल. याखेरीज सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत देवाचा अभिषेक होतो.
आरती झाल्यानंतर देवाची अलंकारिक पूजा बांधली जाते. तसेच सायंकाळी देखील 8 ते 9 वाजेपर्यंत धार्मिक विधी व आरती केली जाते. याव्यतिरिक्त दर रविवारी सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत हा अभिषेकाचा कालावधी असून तेथून पुढे तासभर अलंकारिक पूजा होते, असे पुजारी गुणे यांनी स्पष्ट केले.