बेळगाव लाईव्ह :महान संत पुरुष असणाऱ्या बसवण्णा यांनी जात-धर्म, रंग आणि वर्ग हा भेदभाव दूर करून समाजात समानता निर्माण केली. त्यामुळे संत बसवण्णा यांच्या मार्गावर चालल्यास आपल्या जीवनाचे सार्थक होईल, असे प्रतिपादन महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि संस्कृती विभाग आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवारी गोवावेस येथील श्री बसवेश्वर चौक येथे आयोजित श्री जगज्योती बसवेश्वर जयंती महोत्सवाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.
याप्रसंगी बेळगावचे महापौर मंगेश पवार, उपमहापौर विणा जोशी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, महापालिका आयुक्त शुभा बी., अतिरिक्त जिल्हा आयुक्त विजयकुमार होनकेरी, महापालिका उपायुक्त उदयकुमार तळवार, कन्नड व सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालिका विद्यावती बजंत्री, रत्नप्रभा बेलवाड, बसवराज रोट्टी, इराण्णा दयानवर आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री हेब्बाळकर पुढे म्हणाल्या, आपण बसवण्णांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण केले पाहिजे. जर आपण बसवण्णांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण केले तर आपल्या जीवनाला चांगली दिशा मिळेल. बसवाण्णांनी आपले जीवन सामाजिक सुधारणांसाठी समर्पित केले होते आणि त्यांच्या संघर्षामुळेच आज आपण आनंदी जीवन जगू शकलो. आपण धर्मग्रंथ समजून घेतले पाहिजेत. तसेच त्यांचे सार आणि तत्त्वे आपल्या जीवनात लागू केली पाहिजेत. आपण सर्वांनी समाजातील वाईट अनिष्ट प्रथांना मुठमाती देण्यासाठी आणि चुका सुधारून चांगले जीवन जगण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत.
प्रमुख वक्ते लेखक डॉ. बसवराज जगजंपी यांनी आपले विचार व्यक्त करताना बसवेश्वर हे महान संत होते. ‘ज्ञानाच्या सामर्थ्याने आपण अज्ञानाच्या वाईट गोष्टींवर मात करू शकतो,’ असा संदेश त्यांनी सातत्याने दिला. बसवेश्वरांचे विचार फक्त एका जातीपुरते किंवा एका राज्यापुरते मर्यादित नव्हते, असे सांगितले.
प्रारंभी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी विलास जोशी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्यासह समाजातील प्रमुख व्यक्तींनी बसवेश्वर उद्यानातील श्री बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सदर कार्यक्रमास निमंत्रितांसह विविध जैन संघ संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आणि जैन बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.