बेळगाव लाईव्ह :हलगा -बस्तवाड येथील श्री बसवेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या मालकीच्या जमिनीत राजकीय दबाव आणून सर्व्हे करण्याचा प्रयत्न गावातील कांही व्यक्तींकडून सुरू असून हा प्रकार तात्काळ थांबवण्यात यावा, अशी मागणी श्री बसवेश्वर देवस्थान पंच कमिटीने एका निवेदनाद्वारे जिल्हा पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
हलगा -बस्तवाड येथील श्री बसवेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या सदस्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन काल सोमवारी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना सादर केले. सरकारने हलगा -बस्तवाड येथील सर्व्हे क्र. 166 मधील 15/बी ही 9 गुंठे गायरान जागा गेल्या 22 सप्टेंबर 1983 रोजी गावातील श्री बसवेश्वर देवस्थान पंच कमिटीसाठी दिली आहे. मात्र 2010 मध्ये ग्रामपंचायतकडून या जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला होता.
त्यावेळी देवस्थान पंच कमिटीने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने 2017 मध्ये श्री बसवेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र आता पुन्हा कांही ग्रामस्थांकडून या जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सदर जागेवर सध्या न्यायालयाने हुकूम असतानाही राजकीय दबाव वापरत तहसीलदारांकरवी सर्व्हेचे काम केले जात आहे.
विशेष म्हणजे जिल्हाधिकारी व डीएलआर यांना कोणतीही माहिती न देता हे काम केले जात आहे. हा न्यायालयाचा अवमान असून सदर बेकायदेशीर काम तात्काळ थांबवावे, अशी मागणी श्री बसवेश्वर देवस्थान पंच कमिटीतर्फे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
सदर निवेदन देताना अचानक जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी त्या ठिकाणी आले, तेव्हा त्यांना देखील निवेदनाची प्रत देण्यात आली. त्यावेळी मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना काय समस्या आहे ते बघा आणि त्या जागेचा वाद लवकरात लवकर मिटवा, अशी सूचना केली.