बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील लिंगायत समाज आणि विविध बसवपर संघ-संस्था, संघटनांच्यावतीने कर्नाटकचे सांस्कृतिक नायक विश्वगुरू संत श्री बसवेश्वर यांचा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात भक्तीभावाने साजरा केला जाणार आहे. येत्या रविवार दि. 27 एप्रिलपासून या उत्सवाला प्रारंभ होणार असून रविवार दि. 4 मे 2025 रोजी शहरात विश्वगुरू श्री बसवण्णा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत श्री बसव जयंती उत्सव समिती बेळगावच्या पदाधिकाऱ्यांनी उपरोक्त माहिती दिली. बेळगाव शहरातील सुमारे 15 बसवपर संघटनांनी एकत्रित संघटितपणे मोठ्या प्रमाणात यावेळची विश्वगुरू श्री बसवण्णा जयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या रविवारी 27 एप्रिल रोजी गोवावेस येथील श्री बसवेश्वर सर्कल येथे जयंती उत्सवाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या समारंभास बेळगाव शहर परिसरातील सर्व मठाधीश विविध संघ संस्थांचे प्रमुख आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्या ठिकाणी संत श्री बसवेश्वर यांच्या मूर्तीचे पूजन करून ध्वजारोहण केले जाईल. त्यानंतर श्री बसवेश्वर जयंती निमित्त शहरात बाईक अर्थात दुचाकी रॅली काढली जाईल. ही बाईक रॅली शहरातील विविध भागांमध्ये फिरून रामतीर्थनगर येथे समाप्त होणार आहे.
यावर्षीची श्री बसवेश्वर जयंती विशेष महत्त्वाची आहे. कारण पहिल्यांदाच लिंगायत समाजाच्या सर्व संघ-संस्था, संघटना एकत्रित येऊन ती साजरी करणार आहेत. यापूर्वी दरवर्षी शहरातील लिंगायत संघटना, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा, जागतिक लिंगायत महासभा, लिंगायत बिझनेस फोरम वगैरे विविध संघ-संस्थांकडून त्यांच्या पद्धतीने स्वतंत्रपणे श्री बसव जयंती साजरी केली जात होती.

स्वतंत्र मिरवणूक काढली जात होती. मात्र यावेळी विश्वगुरू श्री बसवेश्वर यांच्या एकाच चित्ररथाच्या नेतृत्वाखाली सर्वांचा सहभाग असणारी भव्य मिरवणूक येत्या रविवार दि. 4 मे 2025 रोजी काढण्यात येणार आहे. आपल्या देशासह जगभरात सध्या हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून देशाला व जगाला विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी आमच्या सर्व संघ-संस्था, संघटना तसेच वकील, डॉक्टर व्यापारी, इंजिनियर आदी सर्वांच्या संघटना, आणि सर्व जाती-धर्माचे बांधव आम्ही सर्वजण एकत्रित येणार आहोत.
श्री बसव जयंती मिरवणुकीला रविवार दि. 5 मे 2025 रोजी सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून प्रारंभ होईल त्यानंतर काकती वेस, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड मार्गे लिंगराज कॉलेज आवारात मिरवणुकीची प्रसाद वाटपाने सांगता होईल. तरी शहरातील लिंगायत समाज बांधवांसह इतर सर्व समाज बांधव संघ संस्थांनी सदर मिरवणुकीत बहुसंख्येने सहभागी होऊन ती यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन श्री बसव जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शेवटी केले.