बेळगावात वाढली आंब्याची आवक : दर उतरले

0
4
Mango
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील होलसेल फ्रुट मार्केटमध्ये सध्या आंब्याची आवक वाढली असून विशेषतः कोकणातील हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.

जानेवारी महिन्यापासून जवळपास २५०० ते ६५०० च्या दरात विकला जाणारा हापूस सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यात आला आहे. बेळगावमधील फळबाजारात हापूस आंब्यांचा हंगाम आता भरात आला आहे.

आठवडाभरापासून कोकणातील देवगड, मालवण, रत्नागिरी, वेंगुर्ला आणि गोवा येथून दररोज १०ते १२ हजार पेट्या दाखल होत आहेत. त्यामुळे हापूस आंब्याचा बाजार सजलेला आहे.

 belgaum

या आंब्यांची सर्वप्रथम नोंद एम. बी. देसाई अँड सन्स या नामांकित घाऊक विक्रेत्याकडे झाली होती. . त्यांच्या दुकानात कोकणातील सर्व प्रमुख भागांतील विविध प्रकारचे आंबे दाखल होत असून, दररोज हजारो ग्राहक आणि व्यापारी येथे गर्दी करत आहेत.

सुरुवातीला जानेवारी महिन्यात जेव्हा हापूसची पहिली आवक झाली, त्यावेळी त्याचे दर २५०० ते ३५०० रुपये प्रति डझन इतके होते. मात्र, सध्या मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने दर घसरून ३०० ते १६०० रुपये प्रति डझन या किमतीत आंबे उपलब्ध होत आहेत. परिणामी, हापूस आंबा आता सर्वसामान्य खरेदीदारांसाठीही परवडण्याजोगा ठरत आहे.

एम. बी. देसाई अँड सन्सचे मालक संदीप देसाई यांनी सांगितले की, एप्रिल व मे हे आंब्याच्या हंगामातील सर्वात भरगच्च महिने असतात. शुक्रवारी आणि शनिवारीही मोठ्या प्रमाणात आंबा दाखल होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.Mango

विशेष म्हणजे या काळात आंबा प्रेमी आणि व्यापारी प्रचंड संख्येने बाजारात दाखल होत आहेत. खरेदीदार खानजादे यांनी देखील यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सध्या विविध भागांतून विविध प्रकारचे आंबे मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. बाजारात रोज हजारो पेट्या येत असून, कोकणातील चविष्ट आणि उच्च प्रतीचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

बेळगावच्या फळबाजारात विविध प्रकारचे आंबे, त्यांचे बॉक्स, पेट्या यांची रचना पाहावयास मिळत असून जानेवारीपासून सुरू झालेली ही आवक सध्या शिगेला पोहोचली आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. आज सकाळीही बाजारात मोठी खरेदीसाठी गर्दी झाली होती. देवगड, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला, कुडाळ, गोवा, सिंधुदुर्ग अशा विविध भागांतून आंबे नियमितपणे दाखल होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.