बेळगाव लाईव्ह :आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या सेक्रेटरीवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज मंगळवारी सकाळी बेळगाव तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायत विकास अधिकारी सेक्रेटरी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.
आंबेवाडी ग्रामपंचायतचे सेक्रेटरी नागाप्पा बसाप्पा कोडली हे काल सोमवारी दुपारी आपल्या मोटरसायकल वरून जात असताना गोजगा -मण्णूर रस्त्यावर त्यांना अडवून त्यांच्यावर रॉडने हल्ला करण्यात आला होता. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
बेकायदा कामे करण्यास नकार दिल्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर घटनेच्या निषेधार्थ बेळगाव मधील पंचायत विकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जोरदार आवाज उठवला आहे. ग्रामपंचायत सिक्रेटरी वरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध करताना त्यांनी हल्लेखोरांना कठोर शासन करण्याची मागणी केली आहे.
त्याचप्रमाणे असे प्रकार पुन्हा घडू नयेत या दृष्टीने उपाययोजना करावी अशी मागणी केली असून तशा आशयाचे निवेदन सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आज मंगळवारी सकाळी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून सीईओ शिंदे यांनी घटनेची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान या प्रकरणाला भाषिक रंग देण्याचा प्रयत्न काही जणांकडून करण्यात येत आहे त्यामुळे पोलिसांनी सदर प्रकरणी भाषिक रंग देऊ नये पोलीस चौकशी करत आहेत योग्य तपास करून कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.