बेळगाव लाईव्ह :शारीरिक व मानसिक छळ करून पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवत अटक करण्यात आलेल्या पतीला बेळगाव पाचव्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव मारुती फकीरा जोगानी (रा. सांबरा) असे आहे. या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, मूळची राकसकोप येथील सविता मारुती जोगानी (रा. महात्मा फुले गल्ली, सांबरा, बेळगाव) हिने पती व घरच्या इतरांनी शारीरिक व मानसिक त्रास दिल्याच्या कारणावरून गेल्या 28 डिसेंबर 2024 रोजी आत्महत्या केली होती.
त्यामुळे आरोपींविरुद्ध सरिताची आई भारता गावडू मोरे (रा. राकसकोप ता. जि. बेळगाव) यांनी मारीहाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी खटल्याचा तपास करून न्यायालयात दोषारोप दाखल केला.
याप्रकरणी सरिताचा पती आरोपी मारुती फकीरा याला मारीहाळ पोलिसांनी गेल्या 2 जानेवारी 2025 रोजी अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी केली होती.
त्यानंतर सदरी आरोपीने बेळगाव येथील पाचवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे रेग्युलर जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाची दखल घेत न्यायालयाने 1 लाख रुपयांचा जामीनदार तितकेच हमीपत्र, साक्षीदारांना धमकावू नये, पोलिसांना तपास कार्यात सहकार्य करावे, अशा अटींवर मारुती जोगानी याला जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्यावतीने ॲड. श्यामसुंदर पत्तार, ॲड. लक्ष्मण पाटील व ॲड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.