बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात सध्या पिण्याच्या पाण्याची स्थिती नियंत्रणात असली तरी भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना पिण्याच्या पाण्याच्या सुरळीत पुरवठ्यासाठी तातडीचे उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात कुठेही कलुषित पाणीपुरवठा होऊ नये यासाठी नियमित तपासणी करावी आणि आवश्यक असल्यास तातडीने उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
तालुका टास्कफोर्स समित्यांनी सातत्याने बैठका घेत राहाव्यात आणि पाणीटंचाईच्या संभाव्य परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणीटंचाई टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधी राखीव ठेवावा, तसेच तहसीलदारांनी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची जबाबदारी स्वीकारावी. पाण्याची पातळी कमी झालेल्या जलाशयांचे नियोजन करून गरजेनुसार आवश्यक त्या भागांत पाणी सोडण्यात यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरात उन्हाळ्यात प्रवाशांना आणि वाहनचालकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भासू नये यासाठी महापालिकेच्या वतीने ट्रॅफिक सिग्नल ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले. तसेच दुष्काळ घोषित भागांमध्ये तातडीने टेंडर प्रक्रिया पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिले.
बैठकीदरम्यान पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या जिल्ह्यात जनावरांसाठी कोणतीही चाऱ्याची टंचाई नाही. चारा बँकांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध असून, जनावरांमध्ये कोणतेही मोठे आजारही आढळलेले नाहीत.
या बैठकीस अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनगेरी, उपविभागीय अधिकारी श्रवण नायक, महापालिका आयुक्त शुभा. बी., तहसीलदार बसवराज नागराळ, कृषी विभागाचे संयुक्त संचालक शिवनगौडा पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी ईश्वर गडादी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि सर्व तहसीलदार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.