बेळगाव लाईव्ह :चन्नम्मानगर येथे वृद्धेच्या डोळ्यात मिरची पूड फेकून दागिने पळविणाऱ्या चोरट्याला उद्यमबाग पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्याकडून 3 लाख 50 हजार रुपये किमतीचे 58 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 50 हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नांव स्वागत रघुनाथ ढापळे (रा. शास्त्रीनगर, दुसरा क्रॉस शहापूर) असे आहे. उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील चन्नम्मानगर सेकंड स्टेज येथे गेल्या 27 जानेवारी 2025 रोजी घरात एकाकी असलेल्या वृद्धेच्या डोळ्यात मिरची पूड फेकून सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते.
भरवस्तीत दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. उद्यमबाग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली होती.
गेल्या महिन्याभरापासून चोरट्याच्या मार्गावर असणाऱ्या या तपास पथकाला काल मंगळवारी यश आले आणि त्यांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या.
तसेच त्याच्याकडून 52 ग्रॅम वजनाचे सुमारे 3 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यासाठी वापरलेली अंदाजे 50 हजार रुपये किमतीची हिरो होंडाची पॅशन प्लस मोटरसायकल असा एकूण 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.