बेळगाव लाईव्ह : रंगपंचमी खेळून पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मुलांचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने दोघा मुलांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना एकसंबा येथे बुधवारी 19 रोजी घडली. वेदांत संजू हिरेकुडे (वय 9) आणि मनोज काशिनाथ कल्याणी (वय 8) असे मृत मुलांची नावे आहेत. सदर घडलेल्या घटनेमुळे हुरेकुडे व कल्याणी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली आहे.
या घटने विषयी अधिक माहिती अशी, बुधवारी सकाळी रंगपंचमी खेळून बागेवाडी यांच्या शेतात असलेल्या विहिरीत वेदांत आणि मनोज हे दोघे अंघोळीसाठी पोहण्यास गेले होते. उशिरापर्यंत ते दोघेही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरु केले.
दरम्यान बागेवाडी यांच्या शेतात असलेल्या विहिरीजवळ कपडे, चप्पल आणि बादली आढळली, यावरून दोघे मुले विहिरीत पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यावेळी गावातील काही युवकांनी पाण्यात शोधाशोध केली असता दुपारी पहिला वेदांत हिरेकुडे याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. विहिरीत पाणी भरपूर असल्याने दुसऱ्या मनोज कल्याणी याचा मृतदेह शोधण्यास अडथळा निर्माण होत होता.
स्थानिकांनी विहिरीतील पाणी बाहेर काढून सदलगा अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. तसेच औरवाड येथील वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांना देखील पाचारण करण्यात आले. सदलगा आणि औरवाड येथील जवानांनी संयुक्त पणे मनोजचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. सायंकाळी मनोज कल्याणीचा देखील मृतदेह सापडला. वेदांत संजू हिरेकुडे हा मूळचा केरुर गावाचा रहिवाशी असून आजोळ एकसंबा येथे आजोबांच्या घरी राहण्यास व शिक्षणासाठी होता.
त्याचे वडील भारतीय सैन्यदलात आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. तर मनोज कल्याणी याच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्याच्या पश्चात आई, बहीण व आजी असा परिवार आहे.
दोघांचे मृतदेह एकसंबा येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सकाळी 11 च्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर जवळपास 6 तास ही शोधमोहीम सुरू होती. मनोज कल्याणी याच्यावर एकसंबा येथे तर वेदांत हिरेकुडे याचा मृतदेह केरूर या मूळ गावी नेण्यात आला. ऐन रंगपंचमीच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे एकसंबा गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेचा सदलगा पोलीस ठाण्याकडून पंचनामा करण्यात आला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी पहावयास मिळाली.