बेळगाव लाईव्ह :संतप्त नागरिकांसह शाळा सुधारणा समितीने आज सकाळी शाळेला टाळे ठोकून तीव्र आंदोलनाचा इशारा देताच खडबडून जाग्या झालेल्या शिक्षण खात्याने सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळा क्र. 33 जुने बेळगाव या शाळेतील त्या वादग्रस्त सहशिक्षिकेची तडकाफडकी बदली केली आहे.
सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळा क्र. 33 जुने बेळगाव या शाळेत कार्यरत असलेल्या त्या सहशिक्षिके बाबत विद्यार्थी व पालकांच्या वाढत्या तक्रारी असल्यामुळे तिची बदली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.
वारंवार केलेल्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे आज सकाळी संतप्त नागरिक व शाळा सुधारणा समितीने शाळेला टाळे ठोकून आक्रमक पवित्रा घेतला होता तसेच त्या शिक्षिकेची त्वरित बदली न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
त्यावेळी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी शाळेला भेट देऊन त्या शिक्षिकेच्या बाबतीत आज सायंकाळपर्यंत योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले होते.
त्यानुसार बेळगाव शहर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्या सहशिक्षिकेचा बदलीचा आदेश जारी केला आहे. सदर आदेशानुसार त्या सहशिक्षिकेची जुने बेळगाव येथील 33 नंबर शाळेतून अनगोळ येथील सरकारी मराठी प्रौढ प्राथमिक शाळा क्र. 34 मध्ये तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या पद्धतीने जुने बेळगाव येथील नागरिकांच्या व शाळा सुधारणा समितीच्या आंदोलनाला यश आल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.