बेळगाव लाईव्ह :नैऋत्य रेल्वेने जाहीर केल्यानुसार तानाजी गल्ली येथील रेल्वे गेट (लेव्हल क्रॉसिंग 386) आज सोमवार दि. 10 मार्चपासून कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सोमवारी सकाळपासून कार्यवाही सुरू झाली आहे.
तथापी रेल्वे खात्याच्या या निर्णयाला तीव्र विरोध होत असून सदर रेल्वे गेट बंद झाल्यास नेहमीच्या सुरळीत रहदारीसह विशेष करून शाळकरी मुलांच्या बाबतीत प्रतिकूल परिणाम होणार असल्यामुळे सदर रेल्वे गेट बंद केले जाऊ नये अशी जोरदार मागणी केली जात आहे.
रेल्वे खात्याकडून शहरातील तानाजी गल्ली, भांदूर गल्ली, फुलबाग गल्लीला जोडले गेलेले रेल्वे गेट (लेव्हल क्रॉसिंग 386) आज सोमवारपासून कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. तशा आशयाचा फलक काही दिवसांपूर्वी रेल्वे खात्यातर्फे रेल्वे गेटच्या ठिकाणी लावण्यात आला आहे.
हे रेल्वे गेट बंद झाल्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न बेळगाव लाईव्हने केला असता प्रामुख्याने यामुळे बेळगाव दक्षिण आणि उत्तर भागाच्या संपर्काचा एक दुवा तुटणार आहे. विशेष करून भरतेश हायस्कूल, 7 नंबर मराठी शाळा, उषाताई गोगटे हायस्कूल वगैरे अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे कारण संबंधित शिक्षण संस्थांचे विद्यार्थी विद्यार्थिनी आजतागायत या रेल्वे गेट मार्गे शाळेला ये जा करत होते आता सदर रेल्वे गेट बंद झाल्यामुळे या शालेय मुलांसमोर शाळा आणि घर गाठण्यासाठी एक तर धोकादायकरित्या मिळेल त्या अन्य मार्गाने रेल्वे मार्ग ओलांडणे किंवा कपिलेश्वर उड्डाणपुलाचा वापर करणे या शिवाय दुसरा पर्याय नाही.
कपिलेश्वर उड्डाणपूल वापर करायचा झाल्यास सदर पुलावर फुटपाथची सोय नाही. त्यामुळे कायम रहदारी असणाऱ्या या पुलावरून शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनींना जीव मुठीत धरून ये -जा करावी लागणार असल्याने ही समस्या ऐरणीवर येणार आहे. कुणालाही इथे ये जा करण्यासाठी उड्डाणपुलावरून दोन किलोमीटर फिरून यावं लागणार आहे.दरम्यान, आज सोमवारी सकाळी तानाजी गल्ली रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद करण्यासाठी रेल्वेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेटच्या ठिकाणी दाखल होऊन मोजमाप करण्यास सुरुवात केली होती. गेट बंद करण्याच्या हालचाली गतिमान झाल्यामुळे बघ्यायची गर्दी झाली होती.
यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी विकास कलघटगी यांनी श्री गणेशोत्सव काळात मूर्ती विसर्जन झाल्यानंतर अनेक जण तानाजी गल्ली रेल्वे येथून आपापल्या परिसरात जातात मात्र आता हे रेल्वे गेट बंद केल्यास गणेशोत्सव मंडळांची मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे सदर गेट मार्गे असणारा ट्रंक रोड बंद करू नये. कपिलेश्वर येथील रेल्वे गेट आणि तानाजी गल्ली रेल्वे गेट येथील रस्ता दुरुस्त करून तो पूर्ववत रहदारीस खुला ठेवावा अशी मागणी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार आहे अशी माहिती दिली.
शहराच्या अंतर्गत भागातील बेळगाव उत्तर आणि दक्षिण यांना जोडणारे महत्त्वाचे मार्ग असलेल्या या दोन्ही रेल्वे गेट मार्गे दक्षिणेकडील शहापूर, वडगाव, खासबाग जुने बेळगाव, अनगोळ, येळ्ळूर वगैरे भाग आणि उत्तरेकडील बेळगाव शहर, शहरातील विविध गल्ल्या, गांधीनगर, शिवाजीनगर वगैरे भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे तानाजी गल्ली येथील रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद करण्याच्या निर्णयाचा जिल्हा व रेल्वे प्रशासनाने फेरविचार करावा. सदर गेट बंद केल्यास नागरिकांना मोठ्या त्रास व समस्येला सामोरे जावे लागणार आहे हे ध्यानात घेऊन आपला निर्णय रद्द करावा आणि तानाजी गल्ली रेल्वे गेट पूर्ववत खुले ठेवावे, अशी मागणी जनतेच्या वतीने विकास कलघटगी यांनी केली.