बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांना माळमारुती पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे.
लोकशाही मार्गाने महाराष्ट्र एकीकरण चळवळीत सक्रीय असलेल्या शेळके यांना रावडी शीटर गुन्हेगारांच्या यादीत समाविष्ट करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 2 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता या प्रकरणाची सुनावणी पोलीस उपायुक्त कार्यालयात पार पडणार आहे.
बेळगाव पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांविरोधात कठोर भूमिका घेतली असून, समितीच्या युवा अध्यक्ष शुभम शेळके यांना थेट तडीपार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. माळमारुती पोलिसांनी त्यांना रावडी शीटर म्हणून घोषित केले असून, त्यांच्यावर विविध गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, शेळके यांच्या आंदोलनामुळे शहरातील शांतता भंग होत आहे, आणि त्यांच्या कारवायांमुळे बेळगाव शहर व जिल्ह्यात अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगाव शहरातील मराठी आणि कन्नड भाषिकांमध्ये ते संघर्ष निर्माण करत असून, त्यांच्या उपस्थितीमुळे सामान्य नागरिक भयग्रस्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.
माळमारुती पोलिसांनी कर्नाटक पोलीस अधिनियम 1963 च्या कलम 55 अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस उपायुक्तांकडे सादर केला आहे. त्यानुसार, शुभम शेळके यांना बेळगाव जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे अशी शिफारस करण्यात आली आहे. या नोटीशीला उत्तर देण्यासाठी शेळके यांनी स्वतः किंवा वकिलामार्फत 2 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता हजर राहावे, असे आदेश नोटीसमधून देण्यात आले आहेत.
मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप समितीने केला आहे.
पोलिसांकडून सातत्याने मराठी कार्यकर्त्यांवर अन्याय होत असून, हा कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न आहे, असा आरोप समितीने केला आहे.