बेळगाव लाईव्ह :सुळेभावी (ता. जि. बेळगाव) गावामध्ये तर 5 वर्षांनी भरणारा ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीचा यात्रोत्सव येत्या मंगळवार दि. 18 ते बुधवार दि. 26 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती श्री ग्राम देवी महालक्ष्मी देवस्थान जिर्णोद्धार ट्रस्ट कमिटीच्या अध्यक्षांनी दिली.
शहरात आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव तालुक्यातील सुळभावी गावामध्ये दर 5 वर्षांनी ग्रामदेवी श्री महालक्ष्मीची यात्रा भरविली जाते.
त्यानुसार पाच वर्षानंतर यंदा ग्रामदेवी श्री महालक्ष्मी देवस्थान जिर्णोद्धार ट्रस्ट कमिटी, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सुळेभावी यांच्यातर्फे येत्या 18 ते 26 मार्च या कालावधीत हा यात्रोत्सव होणार आहे.
श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सवा अंतर्गत पहिल्या दिवशी बडगेर यांच्या घरामध्ये देवीची प्रतिष्ठापना तसेच संध्याकाळी 5 वाजल्यापासून देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम आणि त्यानंतर रात्री होन्नाट सुरू होईल. दुसऱ्या दिवशी 19 मार्च रोजी श्री महालक्ष्मी देवीला गावातून होन्नाट करत संध्याकाळी जत्रा देवस्थान मंडपामध्ये तिची स्थापना करण्यात येईल. त्यानंतर दि. 20 मार्च ते 26 मार्चपर्यंत यात्रा महोत्सव आचरण्यात येईल.
दरम्यान यात्रेच्या चौथ्या दिवशी 21 मार्च रोजी देवीला कानिके आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवारी 26 मार्च 2025 रोजी सायंकाळी यात्रेची सांगता होणार आहे. सदर यात्रेदरम्यान मैदानी खेळ, शाहीर गान, भजन आदींसह विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
तरी सुळेभावी येथील या श्री महालक्ष्मी देवी यात्रा महोत्सवाचा भाविकांनी बहुसंख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करून श्री महालक्ष्मी देवी देवस्थान जिर्णोद्धार ट्रस्ट कमिटीच्या अध्यक्षांनी यात्रेच्या तयारीबद्दल तपशीलवार माहिती दिली. पत्रकार परिषदेस जिर्णोद्धार ट्रस्ट कमिटी आणि सुळेभावी ग्राम पंचायतीचे सदस्य उपस्थित होते.