बेळगाव लाईव्ह:गेल्या ऑक्टोबर महिन्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर बेंगलोर येथील महाराष्ट्र मंडळातर्फे यंदाचे अभिजात मराठीपणाचे औचित्य साधत ‘शब्दाक्षरी’ या अखिल कर्नाटक पातळीवरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गाण्याची जशी वेगवेगळ्या फेऱ्यांची अंताक्षरी असते, तशी मराठी शब्दांवर, साहित्यावर व गाण्यावर आधारित विविध रंजक फेऱ्यांची ही अनोखी स्पर्धा असणार आहे.
बेंगलोरचे महाराष्ट्र मंडळ नेहमीच मराठी भाषेवर आधारित स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करत असते. सदर मंडळाच्या या स्वभाषा प्रेमाला दाद देत राज्य मराठी विकास संस्थेने देखील मदतीचा हात पुढे केला आहे. जाणकार मराठी प्रेमींनी शब्दाक्षरी स्पर्धेत त्यांची संस्था अथवा संघातर्फे सहभागी व्हावयाचे आहे.
सदर स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 15000, 12000 आणि 8000 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या ऑनलाइन होणार आहे. यावेळी संघातील एकाला तरी लॅपटॉप वापरता आला पाहिजे. स्पर्धेची प्राथमिक फेरी येत्या 5 एप्रिल रोजी घेण्यात येणार असून वेळ नंतर कळवण्यात येईल.
अंतिम फेरी मात्र ऑफलाइन महाराष्ट्र मंडळ बेंगलोर येथे घेतली जाईल. प्रत्येक संस्था अथवा संघाकडून दोन -दोन सभासदांचा एक गट असे दोन गट स्पर्धेत उतरू शकतील. सभासदांच्या या गटांसाठी स्पर्धा प्रवेश शुल्क प्रत्येकी 1000 रुपये असणार आहे.
स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या संघ स्पर्धकांचा बेंगलोरला येण्या जाण्याचा तसेच राहण्याचा खर्च महाराष्ट्र मंडळाकडून दिला जाणार आहे शब्दाक्षरी स्पर्धेत नांव नोंदवण्याची अंतिम तारीख गुरुवार दि. 20 मार्च 2025 ही आहे.
तरी स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी दीपक कुलकर्णी (9845185655) अथवा विद्या पळसुले (9886301870) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.