बेळगाव लाईव्ह :कर्नाटक शालांत परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ बेंगलोर यांच्या आदेशानुसार दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2025 सालची एसएसएलसी परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील परीक्षा उद्या 21 मार्च पासून 4 एप्रिल 2025 पर्यंत आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी (डीसी) दिलेल्या माहितीनुसार बेळगाव जिल्ह्यातील 97 आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 130 अशा एकूण 257 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील 37,863 आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 47,511 असे एकूण 82,374 विद्यार्थी विद्यार्थिनी ही परीक्षा देणार आहेत.
परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रातील वीज पुरवठ्यात व्यत्यय येणार नाही याची काळजी घेण्याची सूचना हेस्कॉम अधिकारांना देण्यात आली आहे. परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्रामध्ये बाहेरील अन्य व्यक्ती, संघ, संस्था अथवा राजकीय पक्षांच्या व्यक्ती यांच्यासह प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी व पत्रकारांना प्रवेश बंदी असेल.
परीक्षा शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडावी यासाठी परीक्षा केंद्रांच्या 200 मीटर परिघातील अहितकारक घटना रोखण्यासाठी संचार बंदी असेल. त्याचप्रमाणे परीक्षा केंद्राच्या आसपासची झेरॉक्स दुकाने आणि सायबर सेंटर बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
परीक्षा केंद्रातील वर्गामध्ये परीक्षार्थींना कॅल्क्युलेटर आणि मोबाईल फोन स्वतः सोबत घेऊन जाता येणार नाही. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा पातळीवर शिक्षण तसेच इतर खात्यांच्या अधिकाऱ्यांची भरारी पथके स्थापना झाली आहेत. कोणत्याही परिस्थितीत अथवा कारणास्तव परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना परीक्षेचे नियोजन करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून बेळगावातील प्रत्येक परीक्षा केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
ज्या परीक्षा केंद्रांमध्ये 600 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत अशा केंद्रासह अतिसंवेदनशील अशा 10 परीक्षा केंद्राच्या ठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व 227 परीक्षा केंद्रांमधील वर्गांमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे वेब कास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रांमध्ये आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कॉपी व इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावर शिक्षण खाते आणि इतर खात्याच्या अधिकाऱ्यांची 4 जिल्हा पातळीवरील पदके आणि प्रत्येक शैक्षणिक वलयासाठी 3 पथके या पद्धतीने एकूण 21 भरारी पथके टाकण्यात आली आहेत. परीक्षा निर्भय वातावरणात पार पाडणे हे नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य असणार आहे.