बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये प्रस्तावित रिंग रोड आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला वेग द्यावा, अशी सूचना माजी मुख्यमंत्री व खासदार जगदीश शेट्टर यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. रामनगर ते लोंढा रस्त्यावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून, ती लवकरात लवकर सोडवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
मंगळवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार जगदीश शेट्टर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष भू-संपादन अधिकारी आणि केआयडीबी अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या वेळी बोलताना शेट्टर यांनी बेळगाव रिंग रोड व राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले.
रामनगर ते लोंढा रस्त्यावर दहा किलोमीटरपर्यंत वाहतूक समस्या गंभीर असून, नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर उपाययोजना राबवण्याची गरज आहे, असे त्यांनी सुचविले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी रिंग रोडसाठी आवश्यक असलेल्या सुमारे ४०० एकर जमिनीचे भूसंपादन बाळेकुंद्री, झाड शहापूर आणि इतर भागांमध्ये सुरू असल्याचे सांगितले. या प्रक्रियेसाठी निधी मंजूर असून, १५ मार्चपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश यावेळी देण्यात आले.
दरम्यान, हलगा-मच्छे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले असले तरी काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र, आता तो प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. डिसेंबरपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गासाठी सुरुवातीला ६०० एकर ८ गुंठे जमीन निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता ही जमीन वाढवून ८७० एकर करण्यात आली आहे. यासंदर्भातील ४०७ नोटिफिकेशन शासनाला पाठवण्यात आले आहे. के.के. कोप्प येथे रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी सर्वेक्षण आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मार्चअखेरपर्यंत जॉईंट मेजरमेंट सर्व्हे पूर्ण करून अंतिम अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. यानंतर प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्याचे काम सुरू होईल. विशेष भू-संपादन अधिकारी राजश्री जैनापूर आणि इतर अधिकारीही या बैठकीत उपस्थित होते.