बेळगाव लाईव्ह :खासबाग सर्कल येथे उघडकीस आलेल्या प्रेमीयुगलाच्या खून व आत्महत्या प्रकरणातील मयत प्रियकराच्या कुटुंबीयांनी प्रेयसीच्या कुटुंबीयांवर आपल्या मुलाच्या हत्त्येचा आरोप केला आहे. तसेच जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत प्रशांतचा मृतदेह आपण ताब्यात घेणार नाही असा निर्धार व्यक्त केला. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खासबाग सर्कल जवळील एका घरात प्रेम प्रकरणातून प्रियकराने आपल्या प्रेयसीचा भोसकून खून करण्याबरोबरच स्वतः चाकूने वार करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना काल मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी मयत प्रियकर प्रशांत यल्लाप्पा कुंडेकर याचे शोकाकुल कुटुंबीय आणि येळ्ळूर गावातील नागरिक आज बुधवारी सकाळी शहापूर पोलीस ठाण्यात दाखल होऊन आपल्या मुलाचा घात झाल्याचे सांगितले. त्यांनी मृत ऐश्वर्या महेश लोहार हिच्या घरच्यांनी आपल्या मुलाला मारून टाकल्याचा संशय व्यक्त केला. यासाठी सखोल चौकशी करून दोषींना कडक शिक्षा करावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत प्रशांतचा मृतदेह आपण ताब्यात घेणार नाही असा निर्धार त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांसमोर व्यक्त केला.
मयत प्रशांतचे वडील यल्लाप्पा कुंडेकर यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना माझ्या मुलाला घरी बोलावून घेऊन ठार मारण्यात आले आहे असा आरोप करून आपल्याला न्याय मिळाला हवा अशी मागणी केली. माझा मुलगा सायंकाळी 5 वाजेपर्यंत घरीच होता. मात्र त्यानंतर त्याला बोलावून घेऊन संपवण्यात आले. त्यासाठी आम्ही पोलिसात तक्रार केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आपण केली असल्याचे कुंडेकर यांनी सांगितले. प्रशांत याच्या शोकाकुल आईसह इतर नातलग महिलांनी देखील आमच्या मुलाला सायंकाळी 5 वाजता फोन करून बोलावून घेऊन त्याचा घात करण्यात आला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यात आले आहेत. तेंव्हा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली.
मृत प्रशांतच्या बहिणीने सांगितले की, प्रशांतला काल सायंकाळी 4:30 वाजल्यापासून अज्ञातांचे धमकीचे फोन येत होते. त्यामुळे घाबरलेला प्रशांत घरातल्या लोकांना आपल्यामुळे त्रास नको म्हणून घरातून बाहेर पडला. त्यानंतर त्याच्या मामाने व भावाने फोनवरून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तथापि प्रशांतने फोन उचलला नाही. त्यानंतर आम्हाला घडल्या प्रकाराची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो. त्यावेळी सर्व चूक माझ्या भावाच्या माथी मारण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले.
वृत्तपत्र, प्रसिद्धी माध्यमांमध्ये देखील त्यानेच प्रेयसीचा खून करून आत्महत्या केल्याच्या बातम्या प्रसिद्धीस देण्यात आल्या. मात्र आम्हाला त्यात तथ्य वाटत नाही. कारण प्रशांतच्या शरीरावरील प्राणघातक जखमा पाहता त्याने प्रथम ऐश्वर्याला ठार मारून मग स्वतःला संपवले यावर आमचा विश्वास नाही. तेंव्हा पोलिसांनी चांगल्या पद्धतीने सखोल तपास करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची मागणी आहे. एकंदर या पद्धतीने मयत प्रशांत कुंडेकर याच्या नातलगांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यामुळे सदर प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
त्या दोघांच्या मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
बेळगाव – प्रेम प्रकरणातून प्रेयसीचा चाकूने गळा चिरून खून केल्यानंतर प्रियकरानेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल मंगळवारी संध्याकाळी शहापूर नाथ पै सर्कल जवळ घडली होती.या प्रेम प्रकरणात ऐश्वर्या लोहार (रा.नवी गल्ली) आणि प्रशांत कुंडेकर (रा.येळ्ळूर) या दोघांना आपले प्राण गमवावे लागले.या घटनेमुळे शहापूर परिसरात एकच खळबळ उडाली.
त्याचबरोबर घडकलेल्या प्रकाराबद्दल नागरिकांमधून हळहळ ही व्यक्त करण्यात येत होती.
दरम्यान आज बुधवारी दुपारी दोघांचेही मृतदेह संबंधित कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
मयत ऐश्वर्या लोहार मुतदेहावर शहापूर स्मशानभूमीत तर प्रशांत कुंडेकर याच्या मृतदेहावर येळ्ळूर स्मशानभूमी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.