बेळगाव लाईव्ह विशेष:प्रियकराने प्रेयसीचा चाकूने हल्ला करून खून केला आणि स्वतः लाही संपवले ,नवी गल्ली शहापूर येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या घटनेने केवळ शहापूरच नव्हे तर बेळगाव तालुका हादरून गेला आहे.
आज कालच्या चंगळवादी संस्कृतीमुळे मुलांच्या मुलीकडून आणि मुलीच्या मुलाकडून अवास्तव अपेक्षा वाढत चालल्या आहेत, त्यामुळे अनेकदा अपेक्षाभंगाचे प्रसंग घडत असतात. आणि मग स्वतःचं आणि त्याचबरोबर जोडीदाराचेही जीवन संपवेपर्यंत मजल जाते याचं धोतक म्हणजे नवी गल्ली शहापूर मधील घटना होय.
शहापूर येथे प्रशांत कुंडेकर या येळळूरच्या युवकाने नवी गल्ली शहापूर येथील ऐश्वर्या लोहार या युवतीचा निर्घुणपणे खून केला आणि स्वतःचे जीवन देखील संपवले .या घटनेसंदर्भात बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, प्रेयसीने प्रियकराला थोडं उत्पन्न वाढव असे सांगितले होते.
तो युवक फरशी फिटिंगचे काम करत होता, दररोज चा ताजा पैसा हाताशी येत असला तरपण आपला जमा आणि खर्च याचा ताळमेळ घालता घालता अशा युवकांची कित्येकदा ओढाताण होत असते. स्वप्नाच्या दुनियेत वावरणाऱ्या प्रेयसीचा ज्यावेळी अपेक्षाभंग होतो त्यावेळी अशा पद्धतीच्या घटना घडायला सुरू होतात.
खरंतर प्रेम हे नाजूक बंधन आहे त्यात व्यवहार हा जवळजवळ नसतोच. आणि ज्यावेळी व्यवहार येतो त्यावेळी प्रेम संपतच!त्याचबरोबर अपेक्षेचे ओझे पेलतापेलता जोडीदाराला त्या ओझ्याचच कधीकधी दुखणं वाटू लागतं आणि मग त्याचा पर्यवसन आतताईपणात होतं.
आजच्या या युवा पिढीला अनेक चैनीची साधने उपलब्ध झाल्याने, त्याच बरोबर चंगळवादी संस्कृती बोकाळल्याने त्यांना आपले असणारे उत्पन्न बहुदा कमी पडते आणि मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा पुऱ्या करताना त्यांची दमछाक होते. या सर्व बाबीवर विचार करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ‘अंथरुन बघून पाय पसरणे’ ही म्हण आपल्या पूर्वजांनी ज्यासाठी सांगून ठेवली आहे त्याचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. जेवढे उत्पन्न तेवढा खर्च आणि त्यातच बचत… अशा पद्धतीची त्रिसूत्री जर आपण अवलंबली तर निश्चितच आपण आपलं जगणं सुखकर करू शकतो.
दुसऱ्यांन केलं म्हणून आपण करणे यात कोणताही शहाणपणा नाही, केवळ चित्रपट, टीव्ही ,माध्यमे, मालिका, आणि यातून जर तुम्ही बघून त्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर ते निश्चितच तुम्हाला हितावह ठरणार नाही. आपलं जगणं जर वास्तवाशी धरून असेल तर तुम्ही निश्चितच आपल्या जगण्याला एक चांगली सोनेरी किनार लावू शकाल, नाहीतर अपेक्षाभंगाचे ओझे तुमच्या डोक्यावर कायमच असेल.
या सगळ्यातून सुटका करायची असेल तर आजूबाजूची भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा विचार करून आपलं जगणं कशा पद्धतीने जगायला पाहिजे याचा विचार करणं गरजेचं बनले आहे. बेळगाव नवी गल्ली शहापूर येथील घडलेल्या घटनेपासून बोध घेऊन प्रत्येक तरुण-तरुणीने याचा विचार करणे गरजेचे आहे.