Thursday, March 20, 2025

/

आंदोलनांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करा ट्रेंड जनतेचा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेल्या चन्नम्मा चौकात सतत होणाऱ्या आंदोलनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ज्येष्ठ वकील सचिन बिच्चू यांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाने यावर त्वरित उपाय शोधावा, अशी मागणी केली. यानंतर आंदोलनामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर आता सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, जोरदार विरोध देखील होत आहे. चन्नम्मा चौकात होणाऱ्या आंदोलनांसाठी वेगळी जागा ठरवावी यावर ‘बेळगाव लाईव्ह’ ने जनमत जाणून घेतले असता सोशल मीडियावर यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

शहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्याला जोडणारा चन्नम्मा चौक हा वाहतुकीचा केंद्रबिंदू आहे. येथे आंदोलन केल्याने संपूर्ण शहरातील वाहतूक विस्कळीत होते. उत्तरेकडून येणाऱ्या वाहनांना सदाशिवनगर मार्गे वळवावे लागते, तर संभाजी चौकातून येणाऱ्या नागरिकांना गल्लीबोळातून मार्ग काढावा लागतो. आरटीओ सर्कलकडून येणाऱ्या वाहनांना महानगरपालिका किंवा खडेबाजार मार्गे शहरात जावे लागते. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. वाहतुकीचा खोळंबा हा इंधन आणि वेळेचा अपव्यय करणारा ठरत आहे.

बाहेरून येणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्ग माहिती नसल्याने ते शहरात भरकटतात. कॉलेज, शाळेतील विद्यार्थी आणि कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. आधीच महागड्या पेट्रोलच्या काळात लांबचा मार्ग कापावा लागत असल्याने आर्थिक नुकसानही होत आहे. प्रशासनाने मुख्य चौकात आंदोलनांना बंदी घालावी, चन्नम्मा चौक बंद करण्याऐवजी राजकीय पक्ष आणि संघटनांनी वेगळ्या ठिकाणी आंदोलन करावे, बससेवा बंद पडल्याने विद्यार्थी आणि नोकरदार हैराण होत असून निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा अन्य अधिकारी ठराविक वेळी त्या ठिकाणी जावेत, जेणेकरून शहरातील वाहतूक विस्कळीत होणार नाही असे सल्लेही नागरिकांनी सोशल मीडियावर दिले आहे.Trend

सचिन बिच्चू यांनी याबाबत भाष्य करताना स्पष्ट केले होते कि, आंदोलन हा लोकशाही अधिकार असला, तरी वाहतूक कोंडी करून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले जाऊ नये. नागरिकांचा रोष लक्षात घेऊन प्रशासनाने चन्नम्मा चौकात आंदोलन करण्यास बंदी घालावी आणि आंदोलनांसाठी ठराविक जागा निश्चित करावी. सोशल मीडियावरही नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे. चन्नम्मा चौकातील आंदोलनांमुळे नाहक त्रास होतो. प्रशासनाने सरदार हायस्कूल मैदान, सीपीएड मैदान किंवा सुवर्णसौध परिसर आंदोलनांसाठी खुला करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

काही नागरिकांनी बंगळुरूतील ‘फ्रीडम पार्क’च्या धर्तीवर आंदोलनांसाठी एक ठिकाण निश्चित करावे, असेही सुचवले आहे. तर काहींनी आंदोलनांना विरोध नाही, पण मुख्य रस्ते अडवून आंदोलन करणे चुकीचे आहे, असे म्हणणे मांडले आहे.आंदोलनासाठी योग्य जागा निश्चित करावी आणि प्रशासनाने यावर त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा लोकांचा रोष आणखी वाढेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.