बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये जन्म आणि मृत्यू दाखले वेळेवर न मिळण्याच्या समस्येवर तोडगा म्हणून महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिण आणि उत्तर मतदारसंघांसाठी स्वतंत्र जन्म-मृत्यू दाखले वितरण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
बेळगावमध्ये जन्म आणि मृत्यू दाखले मिळविण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुख्यतः सर्व्हर समस्येमुळे आणि मनुष्यबळाच्या अभावामुळे दाखले वेळेत मिळत नाहीत. याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीशैल कांबळे होते. यावेळी सदस्य राजू भातकांडे यांनी जन्म-मृत्यू दाखले विभागातील अडचणींबाबत मुद्दा उपस्थित केला. नागरिकांना दाखले वेळेवर मिळावेत यासाठी वाढीव संगणक व कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी त्यांनी केली.
त्यावर आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी सांगितले की, जन्म-मृत्यू दाखले विभागाचे सर्व्हर बेंगळुरू येथे असल्याने समस्यांबाबत पत्रव्यवहार केला जाईल. सध्या 120 हून अधिक अर्ज येत असून, 200 हून अधिक दाखल्यांचे वितरण केले जात आहे.

यापुढे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून दक्षिण व उत्तर मतदारसंघांसाठी स्वतंत्र जन्म-मृत्यू दाखले विभाग सुरू केला जाणार आहे. त्यामुळे मुख्य कार्यालयावर असलेला ताण कमी होईल आणि नागरिकांना सेवा अधिक सुलभ होणार आहे.
तसेच, यापुढे 30 पेक्षा जास्त बेड असलेल्या दवाखान्यांतूनच जन्म आणि मृत्यू दाखल्यांचे अर्ज ऑनलाईन स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे दाखले मिळण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल. यासाठी शहरातील डॉक्टर्सना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या नव्या निर्णयामुळे बेळगावमधील नागरिकांना जन्म आणि मृत्यू दाखले मिळवण्यासाठी होणाऱ्या अडचणी दूर होणार असून, ही प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.