Monday, March 17, 2025

/

अवैध, अनैतिक प्रकारांविरुद्ध सावगांवकर आक्रमक;

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील मद्यपी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी -विद्यार्थिनीकडून सावगाव (ता. जि. बेळगाव) येथील शेत जमिनी आणि डॅम परिसराचा गैरवापर केला जात असून या ठिकाणी केल्या जाणाऱ्या अवैध तसेच अनैतिक प्रकारांना तात्काळ आळा घालण्यात यावा, अशी मागणी संतप्त समस्त सावगांववासियांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

सावगांव ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील आणि गावातील प्रमुख नागरिकांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर करण्यात आले. निवेदन सादर करण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात प्रसिद्धी माध्यमांना आपल्या मागणी संदर्भात माहिती देताना सावगांव ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी सांगितले की, आमच्या गावापासून जवळच अंगडी महाविद्यालय असून त्याच्या परिसरात शेतजमीन आहे. अलीकडच्या काळात शहरातील तरुण-तरुणी या ठिकाणी येऊन मद्यपान, धूम्रपान वगैरे गैरप्रकार करत आहेत. त्यामुळे त्या शेतजमीनी जणू स्मोकर झोनच बनल्या आहेत. त्याचप्रमाणे तेथून जवळच सावगांवचा डॅम आहे. या डॅमच्या परिसरात देखील रात्री उशिरा एक -दोन वाजेपर्यंत रंगीत पार्ट्या सुरू असतात. पार्ट्या करणारी मंडळी शेताचे नुकसान करण्याबरोबरच दारू पिऊन रिकाम्या रस्त्यावर बाटल्या फोडणे, डॅमच्या पाण्यात फेकणे वगैरे प्रकार करत असतात.

त्यांना कोणी समजावण्यास गेल्यास शिवीगाळ केली जाते. दिवसभर तसेच रात्री अपरात्री अंगडी महाविद्यालया जवळील शेत जमिनी आणि परिसराचा अंमली पदार्थ सेवन, दारू -सिगारेट पिणे यासाठी वापर केला जात आहे. एकंदर परिस्थिती पाहता सदर परिसरात एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तसे घडल्यास त्यामध्ये शेतजमीन मालक शेतकरी विनाकारण भरडला जाणार आहे.

परवा संध्याकाळीच आमच्या गावातील एका शेतकऱ्याला त्याच्या शेतात शहरातील दोघे कॉलेज विद्यार्थी -विद्यार्थिनी नको त्या अवस्थेत आढळले. तेंव्हा अनैतिक प्रकार करणाऱ्या त्या युगलाला चांगले खडसावून आपल्या शेतात विद्यार्थिनीशी गैरकृत्य करणाऱ्या विद्यार्थ्याला त्या शेतकऱ्याने चोपही दिला. मात्र या पद्धतीने गैर कृत्य करणाऱ्यांना धडा शिकवणाऱ्या बिचार्‍या शेतकऱ्याविरुद्धच पोलिसात तक्रार नोंदवण्याचा प्रकार घडला आहे. या सर्व प्रकारामुळे गावकरी प्रचंड त्रासले आहेत. तेंव्हा जिल्हा प्रशासनाने आणि पोलीस खात्याने याची गांभीर्याने दखल घेऊन सावगाव परिसरातील वाढत्या अवैध व अनैतिक प्रकारांना तात्काळ आळा घालावा, अशी आमची मागणी आहे.Savgav

सावगांव परिसरातील हॉटेल्सना ग्रामपंचायतीने दारूबंदी, हॉटेल रात्री लवकर बंद करणे वगैरे विविध अटींवर परवाने दिले आहेत. मात्र या हॉटेल्समध्ये मद्यपान, धूम्रपान सुरू असते. ही हॉटेल्स रात्री लवकर 9 -10 वाजेपर्यंत बंद करण्याऐवजी रात्रीची 1 -2 वाजेपर्यंत सुरू असणाऱ्या या हॉटेल्स मध्ये तरुण-तरुणींची गर्दी असते. या संदर्भात ग्रामपंचायतीकडून नोटीस बजावूनही त्याची दखल घेतली जात नाही.

तरी पोलीस प्रशासनाने याबाबतीत कठोर कारवाई करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त करून सदर हॉटेल्सनी ग्रामपंचायतच्या नियमांचे पालन न केल्यास व पंचायतीच्या नोटिसीला उत्तर न दिल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील, असा इशाराही ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी दिला. याप्रसंगी सावगाव येथील गावकरी आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.