बेळगाव लाईव्ह : कर्नाटकातील विविध कन्नड संघटनांनी शनिवारी कर्नाटक बंदची हाक दिली असून, या पार्श्वभूमीवर राज्यभरात सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. बेळगावातही या बंदला पाठिंबा देत महाराष्ट्र एस.टी. बसच्या चालक व वाहकांना गुलाब फूल देत, बस कर्नाटकमध्ये आणू नका, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच दुकानांना सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती बस स्थानकावर जाऊन महाराष्ट्र एस.टी. बसच्या चालक आणि वाहकांना गुलाब फूल देत, कर्नाटक बंद असल्याने उद्या बस आणू नये, अशी विनंती केली. तसेच, बंदच्या काळात जर बस कर्नाटकमध्ये आल्या, तर त्याची जबाबदारी आमच्यावर नसेल, असा इशाराही देण्यात आला. यानंतर कार्यकर्त्यांनी बस स्थानक परिसरातील दुकानदारांनाही शनिवारी सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.
या बंदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर बंदी घालावी अशा पोकळ वल्गनेसह सर्वत्र कन्नड भाषेला प्राधान्य द्यावे, म्हादई योजनेची अंमलबजावणी त्वरित करावी, अशा विविध मागण्यांसाठी कर्नाटक बंद पुकारण्यात आला आहे. शनिवारी कर्नाटक बंद असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे. बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, बंददरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाईल. आवश्यक त्या उपाययोजना आखण्यात आल्या असून, गोंधळ होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. संभाव्य आंदोलन, मोर्चे आणि निदर्शने यांना तोंड देण्यासाठी सुरक्षायंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आंदोलनकर्त्यांसोबत प्राथमिक चर्चा पूर्ण झाली असून, लवकरच आणखी एक बैठक होणार आहे. २२ तारखेला कर्नाटक बंद असला तरी शहरात कोणतीही अनुचित घटना घडवून देणार नाही. तसेच, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलीस आयुक्त मार्टिन यांनी दिला आहे.