बेळगाव लाईव्ह :अतिशय जुनी परंपरा असणारे महर्षी धोंडो केशव कर्वे स्थापित पुणे येथील एसएनडीटी महिला विद्यापीठ व अग्रेसर भारत संस्थेतर्फे महिला दिनानिमित्त येत्या शनिवार दि. 8 मार्च 2025 रोजी भारतातील आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 21 महिलांचा विशेष सत्कार करून त्यांना ‘अग्रेसर भारत तेजस्विनी संस्कृता पुरस्कार 2025’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
ज्यामध्ये बेळगावच्या संगीत विशारद ज्येष्ठ संगीत शिक्षिका सौ. संध्या (रोहिणी) कुलकर्णी यांचा समावेश आहे.
महिला दिनानिमित्त पुण्यामध्ये होणाऱ्या उपरोक्त पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विद्यापिठ कुलगुरू उज्वला चक्रदेव ,अग्रेसर भारतचे विनित गाडगीळ आणि महाराष्ट्रातील अनेक मान्यवर उपस्थित असतील.
याप्रसंगी अग्रेसर भारत व्यासपीठातर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित केल्या जाणाऱ्या महिलांमध्ये डाॅ. स्नेहा भागवत, दीनदयाळ विद्यालयाच्या संस्थापिका व समाज सेविका सौ. सिद्धी प्रभू परोब, विशेष शिक्षिका व समाज सेविका सौ. मंजिरी द. जोग आणि संगीत विशारद ज्येष्ठ संगीत शिक्षिका सौ. संध्या (रोहिणी) कुलकर्णी यांचा समावेश आहे. संगीत विशारद संध्या कुलकर्णी या बेळगाव व गोवा दोन्ही ठिकाणी कार्यरत असतात. या महिलांना महिलादिन सोहळ्यात ‘अग्रेसर भारत तेजस्विनी संस्कृता पुरस्कार 2025’ ने गौरवले जाणार आहे.
अग्रेसर भारत व्यासपीठ या संस्थेची राष्ट्रीयत्व आणि राष्ट्राभिमान या दोहोंची जाणीव आणि जोपासना व्हावी तसेच देव देश व धर्माची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी स्थापना झाली आहे. पुणे व महाराष्ट्राचा वैचारिक प्रबोधनाचा शतकानुशतकांचा असलेला सांस्कृतिक वारसा तसेच राष्ट्रीय चारित्र्य जपणे आणि राष्ट्रीय विचारांचे संगोपन करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध सामाजिक विषयांचे आणि विचारांचे मंथन समाजाच्या एकात्मतेसाठी व समाजाची एकात्मता वृद्धिंगत होईल अशाच पद्धतीने करण्यासाठी विविध सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, कार्यक्रमाचे व विविध व्याख्यानमाला आयोजन करण्यासाठी अग्रेसर भारत व्यासपीठ कार्यरत आहे. विनित गाडगीळ (पुणे) हे अग्रेसर भारत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
या वर्षी भारतातील आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 21 महिलांना दि. 8 मार्च 2025 रोजी महिला दिन विशेष सत्कार व पुरस्कार देण्यात येणार आहे.