बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे सातत्याने समोर येत आहे. शहरातील गजबजलेला आणि महत्त्वाचा चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यंदे खूट येथील सिग्नल नजीक वाहतुकीची शिस्त पार मोडीत काढली जात असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. वाहतुकीच्या नियमांकडे सर्वसामान्य नागरिकांसह सरकारी बसचालक देखील दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
बेळगावच्या पश्चिम भागातील तालुक्यांतील तसेच महाराष्ट्रातील चंदगड आणि कोकणातील नागरिक मोठ्या संख्येने बेळगावमध्ये ये-जा करत असतात. अशा परिस्थितीत यंदे खूट हा प्रमुख चौक म्हणून ओळखला जातो. गेल्या सहा महिन्यांपासून येथील सिग्नल कोसळलेला होता.
काही दिवसांपूर्वीच तो सुरळीत करण्यात आला असला, तरीही वाहनचालकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. सिग्नल सुरू होण्याच्या आधीच रस्त्याच्या मधोमध येऊन उभे राहणारे वाहनचालक, सिग्नल सुटताच नियमांचे उल्लंघन करत पुढे धावणारे नागरिक आणि त्यावर कोणतीही ठोस कारवाई न करणारे वाहतूक पोलिस यामुळे या चौकातील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
वाहतुकीचे नियम तोडल्यास सर्वसामान्य नागरिकांवर लगेचच दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, सरकारी बसेस चालवणारे चालक मात्र नियमांना केराची टोपली दाखवत आहेत. या बसचालकांकडून वेगावर नियंत्रण ठेवले जात नाही, चुकीच्या दिशेने गाड्या हाकल्या जातात आणि इतर वाहनचालकांशी हुज्जत घातली जाते.
यात भर म्हणजे, बेंगळुरू बस डेपोमधून अनेक बसेस बेळगावमध्ये दाखल झाल्या असून त्यातील अनेक बसमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून शहरात प्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. फक्त सरकारीच नाही, तर परगावी जाणाऱ्या खाजगी बसचालकांचीही परिस्थिती वेगळी नाही. रात्रीच्या वेळी अतिवेगाने बस चालविणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे, अपघाताला आमंत्रण देणाऱ्या कृती करणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. यामुळे अनेक अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शक्ती योजनेमुळे बससेवेवर मोठा ताण आला आहे. परिणामी, बसेस क्षमतेपेक्षा अधिक भरल्या जात आहेत आणि प्रवाशांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. बसमधून लटकत जाणारे प्रवासी, ओव्हरलोड झालेल्या गाड्या आणि त्यांच्या सुरक्षेची कोणतीही जबाबदारी न घेतलेले प्रशासन यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. हि सर्व परिस्थिती पाहता, या बेशिस्त बसचालकांकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे का? बस चालकांकडून वारंवार वाहतुकीचे नियम मोडले जात असताना प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नाही.
यामुळे भविष्यात मोठा अपघात घडल्यास याची जबाबदारी कोण घेणार? बस चालकांच्या बेशिस्त वर्तणुकीला वेसण घालण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलणार? हे प्रश्न अनुत्तरित असून, या संदर्भात त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा, या बेशिस्तपणामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जाण्याचा धोका आहे.