बेळगाव लाईव्ह :इस्लामिक दिनदर्शिकेनुसार उद्या रविवार दि. 2 मार्च 2025 पासून सुरू होणाऱ्या पवित्र रमजान मास अर्थात सणानिमित्त बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी शहरातील समस्त मुस्लिम बांधवांसह शहरवासीयांना रमजानच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या असून सण शांतता सौहार्दतेने पार पाडण्याचे आवाहन केले आहे.
बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयामध्ये प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्तांनी उपरोक्त आवाहन केले. मागील वर्षी देखील मी पाहिले बेळगाव शहरात रमजान सण अतिशय चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
बेळगाव शहरातील एक चांगली गोष्ट ही आहे की फक्त मुस्लिमच नव्हे तर सर्व जाती-धर्माचे लोक या सणाच्या आनंदात सहभागी होऊन शांततेने सण साजरा करतात. यावेळी देखील सर्वजण याच पद्धतीने हा सण साजरा केला जाईल असा मला विश्वास आहे. तरीही मी शहरवासीयांना आवाहन करतो की त्यांनी शांततेने रमजान सण साजरा करावा.
या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून शांतता कमिटीच्या बैठका घेऊन आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली आहे संघ-संस्था, संघटनांना सणाच्या कालावधीत कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहराच्या संवेदनशील भागात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल.
त्याचप्रमाणे बाहेरून गृह रक्षक दल, केएसआरपीच्या तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. एकंदर रमजान काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिली.