बेळगाव लाईव्ह : आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या पक्ष निलंबनावर चर्चा करण्यात येणार असून आम्ही भाजप हायकमांड आणि शिस्त समितीला यत्नाळ यांचे निलंबन मागे घेण्याची विनंती करू. आमच्या संपूर्ण टीमसह यत्नाळ भाजपमध्येच राहतील आणि पक्षासाठी कार्यरत राहतील, असे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
पक्षातील नेते आणि पक्षावर सातत्याने टीका करणाऱ्या आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्यावर भाजप शिस्तसमितीने निलंबनाची कारवाई केल्यानंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून आज बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री आणि आमदार रमेश जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, यत्नाळ यांच्या निलंबनाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्वरित प्रतिक्रिया दिली नाही, कारण आम्हाला लोकांच्या भावना आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या होत्या. यत्नाळ यांना पक्षातून निलंबित केले जाऊ शकते, याची कल्पना आम्हाला होती. मात्र, हायकमांडच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार मला नाही. पण, आम्ही त्यांना हा निर्णय मागे घेण्याची विनंती करू. पक्ष आम्हा सर्वांपेक्षा मोठा आहे, असे जारकीहोळी म्हणाले.
यत्नाळ यांच्यासह आम्ही सर्वजण शुक्रवारी बंगळुरू येथे बैठक घेणार आहोत. त्यानंतर हायकमांड आणि शिस्त समितीला निलंबन मागे घेण्याची विनंती कशी करावी, यावर चर्चा करू. यत्नाळ हे लिंगायत पंचमसाली समाजाचे तसेच भाजपचे मोठे नेते आहेत आणि त्यांचे निलंबन होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. यत्नाळ यांना पक्षातून काढल्यामुळे आम्ही दुःखी आहोत, असे त्यांनी सांगितले.
मीसुद्धा यत्नाळ यांच्या प्रमाणेच भाजप प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांच्याविरोधात बोललो आहे. बंगळुरूमध्ये होणाऱ्या बैठकीत यत्नाळ यांच्या निलंबनामागील कारणांचा शोध घेऊ. मात्र, आमच्या टीममधील कोणताही नेता भाजप सोडणार नाही. आम्ही पक्षातच राहून २०२८ विधानसभा निवडणुकीत १२० जागा जिंकण्यासाठी मेहनत घेऊ, अगदी निवडणुका वेळेआधी लागल्या तरी, असे जारकीहोळी म्हणाले. मी यत्नाळ यांच्या निलंबनासंदर्भात हायकमांडशी चर्चा केली आहे. यामागे कोण आहे, हे महत्त्वाचे नाही. आपण सर्वजण माणसं आहोत आणि चुका होतात.
गरज भासल्यास, आम्ही यत्नाळ यांच्याकडून हायकमांडकडे पत्र पाठवू, कारण त्यांनी पक्ष बांधण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मला खात्री आहे की, भाजप हायकमांड हा निर्णय मागे घेईल. यत्नाळ एकटे नाहीत, त्यांच्यासोबत आम्ही सर्व आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.