बेळगाव लाईव्ह : देशभरात वाढत असलेल्या बनावट डॉक्टर आणि बोगस शस्त्रक्रियांच्या घटनांवर राज्यसभेत आवाज उठवण्यात आला. राज्यसभेत शून्य प्रहरादरम्यान बोलताना खासदार ईरण्णा कडाडी यांनी देशभरात बनावट डॉक्टर आणि अनधिकृत रुग्णालयांमुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे सांगितले. त्यांनी केंद्र सरकारकडे यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
ईरण्णा कडाडी यांनी सांगितले की, वैद्यकीय व्यवसाय पूर्वी एक सेवा होती, परंतु आजच्या काळात तो नफेखोरीचा व्यवसाय बनला आहे. महागड्या वैद्यकीय महाविद्यालयांचे शुल्क, खासगी रुग्णालयांची वाढती संख्या आणि आरोग्य सेवांचे खाजगीकरण यामुळे रुग्णांची लूट सुरू आहे.
विमा रकमेचा फायदा घेण्यासाठी अनेक रुग्णालयांमध्ये अनावश्यक शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. गुडघा प्रत्यारोपण, डोळ्यांची कॅटॅरॅक्ट शस्त्रक्रिया, पित्ताशय काढणे, अँजिओप्लास्टी आणि मणक्यावरील शस्त्रक्रिया या प्रक्रियांचा गैरवापर होत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट दिले जाते, ज्यामुळे रुग्णांना विनाकारण शस्त्रक्रिया कराव्या लागतात, असा आरोप कडाडी यांनी केला.
केंद्र सरकारने ‘आयुष्मान भारत’सारख्या योजनांद्वारे गरीबांना मोफत आरोग्य सुविधा दिल्या आहेत. मात्र, सध्या बनावट शस्त्रक्रियांच्या घटना समोर येत असल्याने रुग्णांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने त्वरित कठोर पावले उचलावीत आणि रुग्णालयांचे नियमित ऑडिट बंधनकारक करावे, अशी मागणी त्यांनी केली.