बेळगाव लाईव्ह : बारावीच्या बोर्ड परीक्षा अखेर संपल्या असून आता निकालाची प्रतीक्षा सुरू झाली आहे. परीक्षेचा ताण संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि आनंदोत्सव साजरा केला.
रंगपंचमीच्या सणादरम्यान परीक्षा असल्याने मनसोक्त रंगांची उधळण न करू शकलेल्या विद्यार्थ्यांनी आता मात्र मित्रमैत्रिणींसमवेत जल्लोष साजरा केला.
बारावीच्या परीक्षा आज संपल्या असून, निकाल कधी आणि कशा पद्धतीने जाहीर होणार, याबद्दल विद्यार्थी तसेच पालकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. बोर्डाच्या अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी रंगांची उधळण करत आनंद साजरा केला.
शहर परिसरात १४ मार्च रोजी रंगपंचमी साजरी झाली होती, तर शहापूर-वडगाव भागात १९ मार्चला हा सण मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र, परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यात सहभागी होता आले नव्हते. त्यामुळे परीक्षा संपताच महाविद्यालयाच्या आवारातच रंगांची उधळण करत मैत्रीचा आनंद लुटला.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी विशेष उत्साह आणि समाधान दिसून आले. दिवसरात्र अभ्यास आणि परीक्षेच्या टेन्शननंतर हा आनंदोत्सव त्यांच्यासाठी एक मोठा दिलासा ठरला. आता निकालाची अधिकृत घोषणा कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.