बेळगाव लाईव्ह : दरवर्षी प्रमाणे रंगपंचमी निमित्त रंगांना फाटा देऊन शहापूर येथील कै. नारायणराव गुंडोजीराव जाधव सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्टच्यावतीने प्रदूषण मुक्त फुलांची रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शहापूर पोलीस ठाण्याचे सीपीआय शिमानी, माजी उपमहापौर संजय शिंदे, युवा समितीचे शुभम शेळके, अमृत भाकोजी व मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे संस्थापक नेताजीराव जाधव यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना शुभम शेळके यांनी राजस्थानमध्ये साजरी केली जाणारी फुलांची रंगपंचमी बेळगावात साजरी करणाऱ्या कै. नारायणराव जाधव ट्रस्टचे अभिनंदन करून आपले सर्व सण शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना मालोजी अष्टेकर यांनी कै. नारायणराव गुंडोजीराव जाधव सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्टने आतापर्यंत केलेल्या कार्याची माहिती दिली. फुलांची रंगपंचमी आयोजित करून प्रदूषण मुक्त रंगपंचमी कशी साजरी करतात याचा आदर्श पाठ या ट्रस्टने घालून दिला आहे, असे ते म्हणाले.
आपल्या भारतात सर्व सणामागे कोणता ना कोणता विशिष्ट उद्देश आहे. त्याचे पालन करून सर्व समाजातील सण शांततेत आणि उत्साहात साजरे करून आपल्या देशाची आणि धर्माची शान वाढवावी असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात संजय शिंदे व यल्लप्पा कोलकार यांनीही विचार मांडले.
कार्यक्रमास ट्रस्टचे पदाधिकारी स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी गुलाब पुष्प देऊन नेताजीराव जाधव, बापू जाधव, विजय जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर उपस्थितांनी पुष्पदलांची उधळण करून रंगपंचमीचा आनंद लुटला.
याप्रसंगी दिलीप दळवी, प्रभाकर भाकोजी, अशोक चिंडक, यल्लाप्पा कोळकर, दयानंद जाधव, परशराम घाडी, युवराज जाधव, साईराज जाधव, सतीश शिंदे, यशवंत देसाई, शंकर केसरकर, सुभाष शिनोळकर, हिरालाल चव्हाण, प्रदीप शेट्टीबाचे, यल्लाप्पा नागोजीचे, दशरथ शिंदे, तानाजी चव्हाण, राजाराम सूर्यवंशी, बंडू बामणे आदी उपस्थित होते.