बेळगाव लाईव्ह :रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहर पोलीस आयुक्तालयाच्या ठिकाणी आज शुक्रवारी सकाळी काळ्या यादीतील गुंडांची रावडी परेड घेण्यात आली.
रावडी परेडप्रसंगी उपस्थित असलेल्या शहर परिसरातील गुंडांना रमजान सणाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार न करण्याची सक्त ताकीद देण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही भानगडीत न पडता निमूट आपले दैनंदिन काम करा आणि गप्प घरात बसा. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कराल तर गय केली जाणार नाही असा इशारा पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थित गुंडांना दिला.
सण उत्सव आणि सध्याच्या वातावरणात सोशल मीडियावर तेढ पसरवण्यावर देखील कडे कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील पोलीस आयुक्तांनी यावेळी दिलाय.
याप्रसंगी बेळगाव लाईव्ह बोलताना शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी सांगितले की, आज मी रावडी परेड घेऊन उपस्थित काळ्या यादीतील गुंडांच्या गुंडगिरीचा पूर्वइतिहास त्यांच्याकडून जाणून घेतला. तसेच पूर्वी तुम्ही गुंडगिरी करण्याची चूक केली असेल परंतु आता भविष्यात ती चूक पुन्हा करू नका, असे त्यांना समजावले.
तसेच आताचे जे युवक गुंडगिरीकडे वळत आहेत त्यांना स्वतःचा कटू अनुभव सांगून गुंडगिरी करण्यापासून परावृत्त करा असे आवाहन केले. सर्व गुंडांनी देखील माझे म्हणणे मान्य करून त्याप्रमाणे वागण्याचे ठोस आश्वासन दिले आहे असे सांगून तथापि या गुंडांनी समाजातील शांतता भंग करण्याची चूक पुन्हा केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे शहर पोलीस आयुक्त मार्बन्यांग यांनी स्पष्ट केले.