बेळगाव लाईव्ह:हुबळी -धारवाड औद्योगिक वसाहतीला बेकायदा पाणी पुरवठा करण्याच्या योजनेअंतर्गत बेळगाव जिल्ह्यातील विविध तहसील व्याप्तींमध्ये सुरू असलेले जलवाहिन्या घालण्याचे काम बंद करण्यात आल्यामुळे ‘आमचे पाणी, आमचा हक्क’ या आंदोलनाला यश आले आहे.
त्यामुळे येत्या बुधवार दि. 5 मार्च 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणारा मोर्चा मागे घेण्यात आला आहे, अशी माहिती ‘आमचे पाणी, आमचा हक्क’ आंदोलनाचे संयोजक सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी दिली.
शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. मुळगुंद यांनी सांगितले की, बेळगाव शहरासह जिल्ह्यातील इतर शहरा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयातील पाणी भूमिगत जलवाहिनीद्वारे हुबळी -धारवाड औद्योगिक वसाहतीला पुरवण्याचा घाट रचण्यात आला आहे.
‘आमचे पाणी, आमचा हक्क’ या नाऱ्या खाली या प्रकल्पाला तीव्र विरोध करण्यात आला असून सदर प्रकल्प पूर्णपणे रद्द व्हावा अशी मागणी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. तसेच मागणीची त्वरेने पूर्तता न झाल्यास येत्या 5 मार्च 2025 रोजी धर्मवीर संभाजी महाराज चौकातून बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता.
त्यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आमच्या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार त्यांनी आपले आश्वासन पाळले असल्यामुळे प्रथम आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. कारण आता हुबळी -धारवाड औद्योगिक वसाहतीला बेकायदा पाणी पुरवठा करण्याच्या योजनेअंतर्गत हुक्केरी येथे सुरू असलेले काम तेथील तहसीलदारांनी थांबविले आहे.
त्याचप्रमाणे सौंदत्ती, बैलहोंगल, रामदुर्ग वगैरे इतर तहसील व्याप्ती मधील सदर योजनेचे काम देखील थांबविण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली असून याबद्दल आम्ही जिल्हा प्रशासनाचे आभारी आहोत. या पद्धतीने कार्यवाही सुरू झाल्यामुळे आम्ही आमचा येत्या बुधवार दि. 5 मार्च 2025 चा मोर्चा मागे घेत आहोत
हिडकल जलाशय 1976 मध्ये बांधण्यात आले त्यावेळी त्यातील 0.01 टीएमसी पाणी औद्योगिक वापरासाठी राखीव ठेवण्याचे निश्चित झाले होते. मात्र कालांतराने आता हिडकल मधील 0.06 टीएमसी पाणी औद्योगिक कारणासाठी वापरले जात आहे. त्यामुळे त्यापेक्षा जास्त पाणी औद्योगिक कारणासाठी दिले जाऊ नये.
तसेच बेळगावकरांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी आम्ही ‘आमचे पाणी -आमचा हक्क’ हे आंदोलन छेडले होते आणि आता सर्वांच्या सहकार्यामुळे या आंदोलनाला यश आले आहे, असे सुजित मुळगुंद यांनी शेवटी स्पष्ट केले. याप्रसंगी व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे नेते मोदगी व इतर नेते उपस्थित होते.