बेळगाव लाईव्ह :इलेक्ट्रिक बिलासह अन्य विविध कामांची डुप्लिकेट अर्थात बनावट बिले काढून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मुतगा ग्रा.पं. पदाधिकारी, सदस्य व पीडीओ यांना धारेवर धरल्याची घटना आज शुक्रवारी घडली. यामुळे कोणताही निर्णय न होता मुतगा ग्रामपंचायतीची ग्रामसभा अखेर गोंधळात पार पडली.
तब्बल चार वर्षानंतर आज शुक्रवारी पहिल्यांदाच बेळगाव तालुक्यातील मुतगा ग्रामपंचायतीतर्फे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मूलभूत नागरी सुविधांच्या बाबतीतील लोकांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांचे निवारण करणे. त्यांच्या सूचनांची नोंद घेऊन योग्य आवश्यक सूचनांची अंमलबजावणी करणे या उद्देशाने सदर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
विषय पत्रिकेवर त्या अनुषंगाने विषय देखील घेण्यात आले होते. तथापि ग्रामसभेमध्ये त्या विषयांसंदर्भात गावकऱ्यांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाला ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि पंचायत विकास अधिकारी (पीडीओ) समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.
यावेळी संतप्त गावकऱ्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप करत एकही काम झालेले नसताना काढण्यात आलेली बोगस बिले ग्रामसभेत सादर करून ग्रामपंचायत पदाधिकारी व पीडीओंना जाब विचारला. तेव्हा त्यांनी उडवा उडवीची उत्तर देण्यास सुरुवात केल्यामुळे एकच गोंधळ उडवून कोणताही निर्णय न होता त्या गोंधळातच ग्रामसभा पार पडली.
या संदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना एका प्रमुख नागरिकाने सांगितले की, आज पार पडलेल्या मुतगा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये विषय पत्रिकेवरील एकाही विषयासंदर्भात गावकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि पंचायत विकास अधिकारी पीडीओ यांच्यापैकी एकालाही समाधानकारक उत्तर देता आले नाही.
तब्बल चार वर्षानंतर पहिल्यांदा झालेल्या मुतगा ग्रामपंचायतच्या या ग्रामसभेचा उद्देश नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांचे निवारण करणे हा होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आपण विविध कामांमध्ये केलेला भ्रष्टाचार, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग वगैरे कामांच्या नावाने काढलेली डुप्लिकेट बिलांची प्रकरणे यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला गेला. भ्रष्टाचार व डुप्लिकेट बिलांसंदर्भात नागरिकांनी विचारलेला एकाही प्रश्नाला ग्रामपंचायत पदाधिकारी आणि पीडीओंना समर्पक उत्तर देता आली नाहीत.
त्यामुळेच कोणताही निर्णय न होता ही ग्रामसभा गोंधळाच्या वातावरणात पार पडली. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना न बोलवता ही ग्रामसभा उरकून लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार करण्यात आला आहे. तेंव्हा जिल्हा पंचायत सीईओंनी मुतगा ग्रामपंचायतीकडे गांभीर्याने लक्ष देऊन या ठिकाणी झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांच्यावतीने मी करत आहे. तसेच आमच्या हाती दोन-तीन बिले लागली असून ती पूर्णपणे बनावट डुप्लिकेट आहेत. त्यापैकी कंत्राटदार के. के. पालकर यांनी मुतग्यात कोणतेही विकास काम केलेले नसताना त्यांच्या नावे तब्बल 6.5 लाख रुपयांचे बिल काढण्यात आले आहे. या खेरीज येथील तलावाच्या मातीचा जवळपास 1000 ट्रिपच्यावर उपसा करून ती घेऊन जाण्यात आली आहे.
त्याचाही हिशोब ग्रामपंचायतीकडे नाही. याखेरीस शक्ती इलेक्ट्रिकल्स, भाटी इलेक्ट्रिकल्स, चौगुले इलेक्ट्रिकल्स अशा नावाने बनावट बिले काढण्यात आली आहेत. तसेच गुंड्यापगोळ या नावे इलेक्ट्रिक मटेरियल परचेसचे 5 लाखांचे बनावट बिल काढण्यात आले आहे. या पद्धतीने एकूण सुमारे 70 ते 80 लाखाची डुप्लिकेट बिले काढण्यात आली आहेत. तेंव्हा मुतगा ग्रामपंचायतीने एक तर याचे उत्तर द्यावे किंवा प्रशासनाने या ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी आम्हा समस्त गावकऱ्यांची मागणी आहे.