बेळगाव लाईव्ह :श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांच्यावरील शिमोगा जिल्ह्यातील प्रवेश बंदीचा आदेश तात्काळ मागे घेण्यात यावा, अशी मागणी श्रीराम सेना बेळगाव जिल्हा शाखेतर्फे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
श्रीराम सेना बेळगाव जिल्हा अध्यक्ष विठ्ठल गड्डी व उत्तर कर्नाटक लव जिहाद प्रमुख रविकुमार कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना धाडण्यासाठी आज आज शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून त्वरेने पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, कट्टर देशभक्त, गेल्या 50 वर्षापासून देश धर्मासाठी घरदार सोडून आपले जीवन देश धर्मासाठी समर्पित केलेल्या प्रमोद मुतालिक यांच्यासारख्या व्यक्तीवर तुमच्या सरकारकडून वारंवार जिल्हा प्रवेश बंदीची शिक्षा केली जाणे म्हणजे संविधान आणि लोकशाहीने दिलेले व्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकार हिरावून घेण्यासारखे आहे.
ही बाब सरकारसाठी लांच्छनास्पद असून यासाठी तुमच्या सरकारचा निषेध आहे. एका 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला रात्री दहा वाजता रस्त्यावर अडवण्यात काय पुरुषार्थ आहे. संवेदनशील प्रदेश, मागील खटले यांचे कारण देऊन प्रवेश बंदी करण्यात आली असेल तर संवेदनशील प्रदेश निर्माण करणाऱ्यांना भरवस्तीत जाऊन पकडण्याचे सामर्थ्य सरकारमध्ये नाही का? तेंव्हा सरकारने प्रमोद मुतालिक यांच्यावरील शिमोगा जिल्ह्यात प्रवेश बंदीचा आदेश तात्काळ मागे घेऊन संविधानाने दिलेले अधिकार अबाधित राखावेत, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी श्रीराम सेनेचे अन्य पदाधिकारी व बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना रविकुमार कोकितकर यांनी सांगितले की, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक काल शुक्रवारी रात्री 10 वाजता शिमोगामध्ये लव जिहाद संदर्भातील एका पुस्तक प्रकाशनासाठी जात असताना भर रस्त्यात अडवून त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी नंतर त्यांची सुटकाही केली असली तरी त्यांना शिमोगा जिल्ह्यातून हद्दपार करून त्यांच्यावर जिल्ह्यात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.
प्रमोद मुतालिक हे कोणी अतिरेकी नसून गेली सुमारे 50 वर्षे आपले घरदार सोडून ते देवधर्म आणि राष्ट्रासाठी, हिंदुत्वासाठी कार्य करत आहेत. आपल्या धर्म आणि देशहितासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केलेल्या या 70 वर्षीय ज्येष्ठ नेत्याला रस्त्यात अडवून हद्दपार करण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा आम्ही निषेध करतो. विद्यमान काँग्रेस सरकारच्या राजवटीत विधानसभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद च्या घोषणा देण्यात आल्या.
बेळगाव मध्येही तशा घोषणा देण्यात आल्या. या पद्धतीने राष्ट्रविरोधी कृत्य करणाऱ्यांना हद्दपार करण्याऐवजी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या एका देशभक्ताला प्रवेश बंदी केली जात आहे हे निषेधार्ह आहे असे सांगून यापुढे प्रमोद मुतालिक यांच्या बाबतीत राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात असे घडल्यास श्रीराम सेना रस्त्यावर उतरेल आणि त्यानंतर जे घडेल त्याला सरकार प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा रवीकुमार कोकितकर यांनी दिला.