बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग अध्यक्ष शुभम शेळके यांना सोमवारी माळमारुती पोलिसांनी अटक केली असून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
सोमवारी दुपारी बेळगाव पोलिसांनी मिरज मधून शेळके यांना ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर सायंकाळी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केल्यानंतर कारागृहात रवानगी करण्यात आली.
किणये येथील पीडीओ सोबत मराठी युवक टोपना डुकरे याचा झालेला वाद, तरुणाने पीडीओंकडे मराठीत बोलण्यासाठी केलेली मागणी यासंदर्भातील वायरल झालेल्या व्हिडिओनंतर त्याची झालेली कारागृहात रवानगी याच्या पार्श्वभूमीवर त्या युवकाची जामीनावर मुक्तता झाल्यावर शेळके यांनी किणये ग्रामस्थांसह त्या युवकाचा सत्कार केला होता त्यावर दोन भाषिकांत तेढ निर्माण करण्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता त्यानुसार पोलिसांनी त्यांना सोमवारी अटक केली आहे.
मिरज मधून अटक केल्यानंतर त्यांना माळमारुती पोलीस स्थानकात आणण्यात येणार होते मात्र थेट जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यासाठी दाखल करण्यात आले .
किणये येथील पीडीओ सोबत तरुणाच्या झालेल्या वादानंतर सदर तरुणाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामिनावर मुक्तता मिळालेल्या तरुणाचा युवा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला होता. मात्र दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्यात आल्याचा ठपका शेळके यांच्यावर ठेवण्यात आला असून आज त्यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
शेळके यांना अटक झाल्यानंतर वैद्यकीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालय परिसरात आणले त्यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवून दडपशाही करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला होता.