बेळगाव लाईव्ह : महसूल वाढीवर भर देताना गेल्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये अनुक्रमे 6 कोटी 32 लाख 94 हजार 351 रुपये व 13 कोटी 27 लाख 20 हजार 449 रुपये महसूल गोळा करण्यात आल्यामुळे बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डची आर्थिक स्थिती पुनश्च पूर्वपदावर आली असल्याची माहिती बोर्डाचे सीईओ राजीव कुमार यांनी काल शुक्रवारी झालेल्या मासिक बैठकीत दिली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी एमएलआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी होते. कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील सर्व फिरते, बैठे विक्रेते, दुकान गाळे व आस्थापनांकडून नियमितपणे महसूल गोळा केला जात आहे. भाडे थकविणाऱ्यांना नोटीस बजावण्यात येत असून नुकतीच आठ हॉटेल चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. होर्डिंग मधून मिळणारा महसूल थांबला असला तरी त्यासाठी पुन्हा निविदा मागून महसूल वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सीईओ राजीव कुमार यांनी बैठकीत सांगितले. कॅम्पसह कॅन्टोन्मेंट परिसरात जलवाहिन्या घालण्याच्या कामामुळे रस्ते खराब करण्यात आले आहेत. सदर रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्वत करण्यासाठी एल अँड टी कंपनीला नोटीसही बजावण्यात आली आहे.
पाणी बिल व घरपट्टी बिलात वाढ होणार नाही कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलचा दर्जा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे बोर्डाच्या कार्यक्षेत्रात 54 एलईडी दिवे बसवण्यात येणार असून भीमसेन जोशी उद्यान व सिस्टर निवेदिता उद्यान विकासासाठी सामाजिक संघटना पुढाकार घेत आहेत. कॅन्टोन्मेंटच्या मराठी, उर्दू , इंग्रजी शाळांचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी कॉरिडोर व शाळा सुधारणा समिती स्थापन केली आहे. दोन वर्षात खाजगी शाळांच्या बरोबरीने दर्जा राखण्याचे नियोजन केले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
बैठकीत सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर बोलताना अध्यक्ष ब्रिगेडियर मुखर्जी यांनी तुमचा निर्णय स्वागतार्थ आहे. मूर्ती उभारण्यास आमचा विरोध नाही.मात्र त्यासाठी पहिल्यांदा योग्य जागा शोधा, अशी सूचना केली.
बैठकीला उपस्थित असलेल्या खासदार जगदीश शेट्टर यांनी कॅन्टोन्मेंट हद्दीतील विकास कामांची यादी मला द्या. म्हणजे खासदार फंडातून मला शक्य ती मदत करता येईल, असे आश्वासन दिले. बैठकीस आमदार असिफ (राजू) सेठ यांच्यासह कॅन्टोन्मेंट बोर्डचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.