Thursday, March 20, 2025

/

मारुतीनगरचा संपूर्ण रस्ता सांडपाण्याखाली; रहिवाशांमध्ये संताप

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव -सांबरा रोड वरील एससी मोटर्सच्या मागील बाजूस असलेल्या मारुतीनगर या वसाहतीतील मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्णपणे सांडपाण्याखाली गेला असून सर्वत्र दुर्गंधी पसरण्याबरोबरच रस्त्यावरून ये -जा करणे मुश्किल झाल्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शहरातील एससी मोटर्सच्या मागील बाजूस असलेली मारुतीनगर ही वसाहत बऱ्याच वर्षापासून विविध नागरी समस्यांना तोंड देत आहे. वैज्ञानिक गटार बांधकामामुळे सध्या मारुतीनगर मधील सांडपाण्याची समस्या गंभीर बनली आहे.

तीन ते चार गल्ल्यांमधील तुंबलेल्या गटारीमुळे येथील मुख्य रस्ता संपूर्णपणे सांडपाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वसाहतींमध्ये ये-जा करताना स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास -मनस्ताप सहन करावा लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षावाल्या मामांना तर या सांडपाण्यातून रिक्षा नेताना कसरतच करावी लागत आहे. गंभीर बाब ही की रस्त्यावर साचलेल्या या पाण्यामध्ये सापांचा वावर असतो. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांना विशेष करून पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत असते. मोठ्या प्रमाणात गेल्या अनेक दिवसापासून साचून राहिलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात अस्वच्छ दुर्गंधी पूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी रहिवाशांच्या विशेष करून लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला. तरी लोकप्रतिनिधींसह महापालिका आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्याच्या समस्येचे युद्धपातळीवर निवारण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी जोरदार मागणी मारुतीनगर येथील रहिवाशांनी केली आहे.Drainage water

बेळगाव लाईव्ह समोर प्रतिक्रिया व्यक्त करताना स्थानिक रहिवाशी सचिन गावडे व माजी सैनिक अशोक कैणवणी यांनी सांगितले की, गटारी व्यवस्थित नसल्यामुळे तीन ते चार गल्ल्यांचे पाणी आमच्या नगराच्या मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून तुंबून राहिले आहे. त्यामुळे जाण्या येण्यासाठीचा रस्ताच गायब झाला आहे. साचलेल्या सांडपाण्यात सापांचा वावर असल्यामुळे जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येसंदर्भात आम्ही किमान सात-आठ वेळा स्थानिक आमदारांची भेट घेतली. त्यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले त्यानुसार या ठिकाणी संबंधित अभियंते येऊन पाहणी करून देखील गेले. मात्र त्यानंतर कोणतीच प्रगती झालेली नाही. सध्याची परिस्थिती पाहता येथील नागरी सुविधांसाठी मंजूर झालेला निधी नेमका जातो कुठे? असा प्रश्न पडू लागला आहे. सांडपाणी व दलदलीमुळे सध्या येथे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रस्त्यावरील घाण पाण्यामुळे मुलांना शाळेला ये -जा करताना त्रास होत आहे.

एकंदर परिस्थिती पाहून बाहेरील पाहुणे मंडळी देखील आमच्याकडे येण्यास नाराज असतात असे सांगून स्थानिक आमदारांसह महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्याच्या समस्येचे त्वरेने निवारण करावे अशी मागणी माजी सैनिक कैणवणी यांनी केली, तर सचिन गावडे यांनी आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्हा मारुतीनगरवासियांना नाईलाजाने महापालिकेसमोर धरणे सत्याग्रह करावा लागेल असा इशारा दिला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.