बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत पुन्हा एकदा मराठी भाषेची अवहेलना झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नवनिर्वाचित महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी विलास जोशी यांच्या दालनाबाहेरील पाट्यांवर केवळ कन्नड आणि इंग्रजी भाषेतील मजकूर असून मराठीला पूर्णतः वगळण्यात आले आहे. या प्रकारामुळे मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
बेळगाव महानगरपालिकेत नवनिर्वाचित महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी विलास जोशी यांच्या कार्यालयाबाहेरील नामफलकांवर मराठी भाषेची उपेक्षा करण्यात आली आहे.
या पाट्यांवर फक्त कन्नड आणि इंग्रजी भाषेत नावे असून मराठीत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, महापौर मंगेश पवार हे स्वतः मराठी भाषिक आहेत, मात्र त्यांच्या मातृभाषेलाच स्थान न देणे हि बाब खटकणारी आहे.
या प्रकारामुळे बेळगावमधील मराठी भाषिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यापूर्वीही बेळगाव महापालिकेत मराठी भाषा डावलण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. प्रशासन वारंवार मराठी भाषिकांच्या भावना दुखावणारे निर्णय घेत असल्याची भावना मराठी भाषिक नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे आता मराठी भाषिक संघटनांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत मनपामध्ये मराठीला सन्मानाचे स्थान मिळवून देणे अत्यावश्यक आहे.
एकीकडे भाषिक अल्पसंख्यांकांचा विषय प्रलंबित असताना दुसरीकडे मराठीचे महापालिकेतील स्थान धूसर होत चालले आहे. कन्नड इंग्लिश सोबत बेळगाव मधील मराठी भाषिकांच्या सोयीसाठी मराठीत फलकाची मागणी करण्यात येत असताना प्रशासनाने मात्र मराठीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
एकेकाळी बेळगाव महापालिकेत मराठीचे प्राबल्य होते हळूहळू मराठी भाषिक नगरसेवकांची संख्या देखील घटत चालली आहे असे असताना उर्दू आणि कन्नड भाषिक नगरसेवकांचे प्रबल्य वाढले आहे अगोदरच प्रशासनाची गळचपी आणि त्यातच नगरसेवकांची कमी संख्या त्यामुळे मराठी मनपा वरील अस्तित्व पुसटच होत आहे.