बेळगाव लाईव्ह :खादरवाडी येथील मुख्य रस्त्याचे विकास काम अर्धवट झालेले असताना ते पूर्ण झाल्याचे दाखवून मंजूर झालेला निधी हडपण्याच्या प्रयत्नात असलेल्या ठेकेदाराला गावातील श्रीराम सेना हिंदुस्तान आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारताच त्याने बांधकाम साहित्य जागेवरच टाकून तेथून काढता पाय घेतल्याची घटना आज सोमवारी घडली. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्याचे काम व्यवस्थित पूर्ण न केल्यास बेळगाव -खानापूर हमरस्त्यावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
खादरवाडी येथील अर्धवट विकास झालेल्या प्रमुख रस्त्याचे काम व्यवस्थित पूर्ण व्हावे यासाठी शेतकरी संघटना खादरवाडी आणि श्रीराम सेना हिंदुस्तान या दोन्ही संघटना गेल्या दोन महिन्यापासून प्रयत्न करत आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी देखील निवेदनाची दखल घेऊन जिल्हा पंचायतला आणि तालुका पंचायतीच्या अभियांत्रिकी विभागाला पत्र पाठवून अर्धवट काम झालेल्या त्या रस्त्याचे इन्स्पेक्शन करून तो त्वरेने पूर्ण करून द्यावा अशी लेखी सूचना केली आहे.
मात्र तरीही संबंधित कंत्राटदार आज सोमवारी रस्त्याचे काम अर्धवट झालेले असतानाही ते पूर्ण झाले आहे असे दाखवून निधी हडपण्याच्या प्रयत्नात होता. याबाबतची कुणकुण लागताच गावातील श्रीराम सेना हिंदुस्थान आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठेकेदाराला जाब विचारला. त्यावेळी त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत बांधकाम साहित्य जागेवरच टाकून घटनास्थळावरून पळ काढला.
या घडल्या प्रकाराची माहिती देऊन शेतकरी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते मनोहर पिंगट म्हणाले की, अशी अर्धवट कामे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. कोणी स्वतःच्या खिशातील पैसे घालून गावातील विकास कामे करत नाहीत. आम्ही सरकारकडे भरत असलेल्या कराच्या पैशातून ही सर्व कामे होतात. तेंव्हा रस्त्याचे जे अर्धवट काम झालेले आहे ते लवकरात लवकर व्यवस्थित पूर्ण करून द्यावे हीच आमची सरकारला विनंती आहे. संपूर्ण रस्त्याचे काम व्यवस्थित पूर्ण न झाल्यास बेळगाव -खानापूर रोड अडवून रास्ता रोको केला जाईल, असा इशारा पिंगट यांनी उपस्थित कार्यकर्त्यांच्यावतीने दिला.
त्याचप्रमाणे सदर रस्त्यासह गावातील विकास कामांवर नागरिकांनी लक्ष ठेवावे आणि काम अर्धवट सोडल्याचे दिसताच ती बाब शेतकरी संघटनेच्या निदर्शनास आणून द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी मनोहर पिंगट यांच्यासह पिंटू सुतार , राजेश पाटील , राकेश पाटील, अरुण माळवी, चांगदेव येळूरकर, सिद्धार्थ कडलेकर , संतोष गुरव अमित साखळकर , भरत पाटील , मोहन गोरल, आप्पाजी पिंगट आदी गावातील बहुसंख्य कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या.