बेळगाव लाईव्ह :केएसआरटीसी बस कंडक्टर आणि ड्रायव्हर्सवर अलिकडेच झालेले हल्ले आणि मराठी समर्थक कार्यकर्त्यांनी केलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ कार्यकर्ते वाटाळ नागराज यांच्या नेतृत्वाखालील कन्नड समर्थक संघटनांनी येत्या शनिवार दि. 22 मार्च रोजी राज्यव्यापी कर्नाटक बंदची हाक दिली आहे.
बेंगलोर येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत बंद बाबत अंतिम निर्णय घेण्यात येऊन येत्या 22 मार्च रोजी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंदची घोषणा करण्यात आली. केएसआरटीसी वाहतूक कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर शाई लावली आणि त्यांच्यावर शारीरिक हल्ला केला अशा अलिकडच्या घटनेला प्रतिसाद म्हणून हा बंद आयोजित करत पुन्हा कानडी संघटनांनी कुईकुई सुरूच ठेवली आहे.
वाटाळ नागराज आणि इतर कन्नड समर्थक नेत्यांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करत भविष्यात असे हल्ले रोखण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. बंदच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता बेंगलोरमध्ये टाउन हॉल ते फ्रीडम पार्क असा निषेध मोर्चा निघेल.
वाटाळ नागराज यांनी हा निषेध कन्नड स्वाभिमानाचा लढा असल्यामुळे त्यादिवशी जनतेने प्रवास टाळून निषेधाला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे. प्रमुख वाहतूक संघटना आणि व्यावसायिक गट या बंदला पाठिंबा देत असल्यामुळे प्रवाशांनी त्यांचे वेळापत्रक त्यानुसार आखण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.