बेळगाव लाईव्ह : कर्नाटकातील काही कन्नड संघटना सातत्याने मराठी भाषिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असून सोमवारी बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर बंदी आणावी, अशी मागणी करत करवेचे वाटाळ नागराज यांच्या नेतृत्वाखाली कन्नड संघटनांनी पुन्हा बेळगावकरांना वेठीला धरले.
बेळगाव – बऱ्याच वर्षानंतर बेळगावत आलेल्या वाटाळ नागराज यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधातील आपली गरळ ओकून दाखवली. आम्ही सातत्याने म.ए.समितीवर बंदी घालण्याची मागणी करतो. मात्र, त्याकडे कर्नाटक सरकार दुर्लक्ष करते. यामुळे सरकारने म.ए.समितीवर बंदी घातली नाही तर पुढील हिवाळी अधिवेशन बेळगावात होऊ देणार नाही अशी दर्पोक्ती वाटाळ नागराज यांनी केली आहे.
बेळगावमध्ये सोमवारी कन्नड संघटनांनी ‘बेळगाव चलो’ ची हाक देत सरकारकडे समिती आणि शिवसेनेवर बंदी घालण्याची मागणी करत राणी चन्नम्मा चौकात आंदोलन केले. यासह म्हादई योजनेसंदर्भातही कन्नड संघटनांनी मागणी केली. मात्र कन्नड संघटनानी पुकारलेल्या या आंदोलनामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल झाले.
आंदोलनकर्त्या कन्नड संघटनांच्या मूठभर कार्यकर्त्यांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली. याचा फटका अनेक नागरिकांना बसला.
भर दुपारी उन्हाचे चटके सोसत कित्येक नागरिकांना पायपीट करावी लागली. तर अनेक वाहनचालकांना नाहक शहराच्या फेऱ्या माराव्या लागल्या. कन्नड संघटनांच्या या मागण्या मान्य करण्यात न आल्यास २२ मार्च रोजी कर्नाटक बंदची पोकळ वल्गनाही कन्नड संघटनानी केली आहे.