बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील जय किसान होलसेल भाजी मार्केट फक्त सकाळी सुरू ठेवण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तेंव्हा हे भाजी मार्केट सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळी सुरू ठेवण्यात यावे अशी विनंती आम्ही केली आहे. आमचे विनंती मान्य करून लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी केली जावी अन्यथा आम्ही हे भाजी मार्केट बंद पाडू, असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघ व हरित सेनेचे नेते प्रकाश नायक यांनी दिला.
पुना -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाजवळील जय किसान होलसेल भाजी मार्केटच्या ठिकाणी आज शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. ते म्हणाले की, गेल्या तीन-चार महिन्यापासून आम्ही केलेल्या निरीक्षणात असे दिसून आले आहेत की जय किसान भाजी मार्केटच्या वेळापत्रकामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
सदर भाजी मार्केट फक्त सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना चांगला भाव मिळत नाही ही बाब आम्ही जिल्हाधिकारी आणि एपीएमसीच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावर घातली आहे. मे. जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट्स असोसिएशनच्या अध्यक्षांना देखील ही बाब कळावी म्हणून आज आम्ही त्यांची भेट घेतली आहे. सदर मार्केट फक्त सकाळच्या वेळी सुरू राहत असल्यामुळे ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळत नाही. परिणामी मालाची खरेदी न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही बाब आज आम्ही या भाजी मार्केटच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली असून भाजी मार्केट सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळी सुरू ठेवण्याची विनंती केली आहे.
मार्केट सायंकाळी सुरू ठेवल्यामुळे दिवसभरात शेतातून काढलेला ताजा भाजीपाला या ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध होऊ शकतो. ताजा माल असल्यामुळे ग्राहक ही त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात आणि शेतकऱ्यांना देखील त्रास न होता चांगला भाव मिळू शकतो. अन्यथा सध्याच्या वेळापत्रकानुसार शेतकऱ्यांना सकाळी भाजी मार्केट खुले होत असल्यामुळे रात्री-अपरात्री 3 वाजताच आपल्या भाजीपाल्यासह मार्केटमध्ये येऊन मुक्काम ठोकण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर त्याला न्याय मिळवून देणे हे रयत संघटनेचे कर्तव्य आहे, असे नायक यांनी सांगितले.
आता आम्ही जय किसान भाजी मार्केटच्या अध्यक्षांना विनंती केली आहे. हे भाजी मार्केट सकाळ संध्याकाळ अशा दोन्ही वेळेला सुरू ठेवण्यात यावे अशी आमची मागणी आहे. मात्र तरीही त्यांच्या अंतर्गत राजकारण आणि स्वार्थासाठी आमची मागणी मान्य केली गेली नाही तर हे मार्केट बंद पडले जाईल.
शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या अशा भाजी मार्केटची आम्हाला गरज नाही असे स्पष्टपणे आम्ही अध्यक्षांना सांगितले आहे असे सांगून त्या अनुषंगाने लवकरात लवकर जर सकारात्मक कार्यवाही झाली तर आम्ही जय किसान होलसेल भाजीपाला व्यापारी संघटनेच्या सोबत आहोत, अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काय करायचे आहे ते आम्ही करू, असे प्रकाश नायक शेवटी म्हणाले. याप्रसंगी रयत संघटनेचे अन्य पदाधिकारी, सदस्य आणि जय किसान भाजी मार्केट व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.