बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये सुरू असलेल्या जय किसान खाजगी भाजी मार्केटला बंद करण्याच्या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अधिकृत परवानगीशिवाय चालवले जात असलेल्या या बाजारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
बेळगावमध्ये जय किसान खाजगी भाजी मार्केट गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू असून, त्याच्या कायदेशीर वैधतेबाबत शंका उपस्थित केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य रायथ संघ आणि हसिरू सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येत आंदोलन केले.
कर्नाटक राज्य रयत संघाचे जिल्हाध्यक्ष चूनप्पा पूजारी यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले, की या खाजगी बाजाराला कोणतीही अधिकृत परवानगी नाही. तरीदेखील येथे गाडी भाडे, जकात आणि इतर स्वरूपात मोठ्या प्रमाणावर अवैध वसुली केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. एपीएमसी बाजारात शंभर एकर जमीन मोकळी असतानाही प्रशासन खाजगी बाजाराला मूकसंमती का देत आहे? असा सवाल करत त्यांनी, सरकार, जिल्हा प्रभारी मंत्री, आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित खाजगी एपीएमसी बंद करण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी केली.

याच पार्श्वभूमीवर रायबाग तालुक्यातील देवापूरट्टी गावात साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचाली सुरू असून, त्यामुळे पर्यावरण प्रदूषणाचा धोका असल्याने ग्रामस्थांनी त्याला विरोध दर्शवला आहे. जर सरकारने या दोन्ही मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर भविष्यात रास्ता रोकोसह तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्याची जबाबदारी प्रशासनावर असेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेचे अनेक पदाधिकारी तसेच शेतकरी सहभागी झाले होते.