बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या हायवे पेट्रोल पोलीस अर्थात महामार्ग गस्ती पोलीस पथकाकडून राष्ट्रीय महामार्गावर वाहन ओव्हरलोड असल्याचे कारण पुढे करून अवजड वाहन चालकांना दररोज खुलेआम पैशाला लुटण्याचा प्रकार सुरू असल्यामुळे संताप व्यक्त होत आहेत. लुबाडणुकीच्या या प्रकाराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सदर व्हिडिओमध्ये बेळगाव सुवर्ण विधानसौध समोरील पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेळगावचे हायवे पेट्रोल पोलिसांनी एक ट्रक अडवलेला दिसतो.
घटनेचा सारांश असा की, ट्रकमध्ये नियमाचे उल्लंघन करून क्षमतेपेक्षा जास्त माल भरला असल्याचे कारण पुढे करून हायवे पोलिसांनी त्या ट्रक चालकाला 500 रुपये दंड भरण्यास सांगितले. तेंव्हा ट्रक चालकाने आपली परिस्थिती सांगितली. मालक आपल्याला ठराविक पैसे देत असतो आणि इथवर येईपर्यंत मी बऱ्याच ठिकाणी पोलिसांना एन्ट्री देत आल्यामुळे माझ्याकडे आता 500 रुपये नाहीत असे सांगितले. त्यावेळी पैसे न देऊन कसे चालेल? तू या रस्त्यावर नवा आहेस का? असा प्रश्न पोलिसांनी त्याला केला.
तसेच एक तर 500 रुपये देऊन त्याची पावती घे अन्यथा 200 रुपये देऊन तू ट्रक घेऊन जाऊ शकतोस असे त्या ट्रक चालकाला सुनावले. तसेच आम्हाला दिलेले पैसे तू आमचे नांव सांगून तुझ्या मालकाकडून वसूल कर असा निर्लज्ज सल्लाही पोलिसांनी त्याला दिला.
अखेर त्या ट्रक चालकाकडून 100 रुपयांची चिरमुरी घेऊन हायवे पेट्रोल पोलिसांनी त्याला जाऊ दिले. मात्र या सर्व घटनेचे शिताफीने व्हिडिओ चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याद्वारे त्या ट्रक चालकाने बेळगावचे हायवे पोलीस कशाप्रकारे अवजड वाहन चालकांना लुटतात हे सर्वांसमोर आणले.
एकंदर या पद्धतीने पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 2 वर ओव्हरलोडचे कारण पुढे करून बेळगावचे हायवे पेट्रोल पोलीस पथक ट्रक आणि लॉरी चालकांकडून दररोज प्रत्येकी 200 रुपये वसूल करत असते, असा या सर्व अवजड वाहन चालकांचा आरोप आहे.