बेळगाव लाईव्ह : वृद्धाश्रम उभारण्यासाठी खरेदी केलेली जमीन प्लॉटमध्ये रूपांतरित करून विक्री केली जात असल्याचा आरोप बेळगाव दिव्यांग संघाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. या प्रकाराला दिव्यांग संघाच्या माजी सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बेळगाव दिव्यांग संघाच्या वतीने वृद्धाश्रम उभारण्यासाठी विशेषतः जमीन खरेदी करण्यात आली होती. मात्र, विद्यमान पदाधिकारी या जमिनीचा विनियोग वृद्धाश्रमासाठी न करता ती ‘एन.ए.’ प्लॉटमध्ये रूपांतरित करून विक्री करत असल्याचा आरोप संघाच्या माजी सदस्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर दिव्यांग संघाचे माजी सदस्य जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल झाले. त्यांनी सध्याच्या पदाधिकाऱ्यांच्या निर्णयाचा निषेध नोंदवत हा प्रकार त्वरित थांबविण्याची मागणी केली.
यावेळी संघाचे माजी सचिव यल्लप्पा बांदिवडकर यांनी, विद्यमान पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही माजी सदस्यांचा विश्वास न घेता जमिनीच्या विक्रीसाठी पाऊले उचलल्याचा आरोप केला. तसेच, हा व्यवहार अन्यायकारक असून संबंधित प्लॉट कोणीही खरेदी करू नये, असे आवाहन केले.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी महांतेश, गजानन, डी. व्ही. पवार, बाळेकुंद्री, लक्ष्मीकांत पाटील, पी. के. मण्णूरकर, चंद्रू वडर, नेमिनाथ बस्तवाडकर, एस. के. पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.