बेळगाव लाईव्ह :जुने बेळगाव येथील श्री नरवीर तानाजी तालीम स्पोर्ट्स चषक -2025 या भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद श्रीराम सेना हिंदुस्थान, अनगोळ संघाने हस्तगत केले आहे.
सदर स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एस.आर.एस. हिंदुस्थान अर्थात श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ संघाने प्रतिस्पर्धी श्री गणेश स्पोर्ट्स वडगाव संघावर 6 गडी राखून निर्विवाद विजय मिळविला. मर्यादित 6 षटकांच्या अंतिम सामन्यात एस.आर.एस. हिंदुस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना श्री गणेश स्पोर्ट्स वडगाव संघाने 5.5 षटकात 8 गडी बाद 33 धावा जमविल्या.
हे आव्हान यशस्वीरीत्या पेलताना एस.आर.एस. हिंदुस्थान संघाने 4 षटकात 2 गडी बाद 34 धावा झळकावून विजेतेपदाच्या चषकावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्काराचा मानकरी एस.आर.एस. हिंदुस्थान संघाचा राकेश असलकर हा ठरला. त्याचप्रमाणे मालिकावीर किताब श्री गणेश स्पोर्ट्स वडगावच्या मनीष घाडगे याने पटकावला.
एस.आर.एस. हिंदुस्थान संघाचे उमेश कुर्याळकर आणि प्रकाश उचगावकर यांनी स्पर्धेतील अनुक्रमे उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज हे पुरस्कार मिळविले.
अंतिम सामना आणि स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मदन पाटील, जितेंद्र चौगुले, मनोहर होसुरकर, गजानन रेडेकर, संतोष शिवणगेकर, पृथ्वी सुतार, सतीश खनूकर, प्रशांत सुतार, योगेश धामणेकर, सौरभ टपाले, सुनील टपाले या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला.