बेळगाव लाईव्ह : सोशल मीडियाचे वेड वाढत असताना काही जण समाजभान हरवत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून फॉलोअर्स आणि लाईक्ससाठी रस्त्याच्या मधोमध नृत्य करत व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणींनी जबाबदारीची जाण ठेवायला हवी. बेळगावमध्ये ७ फेब्रुवारी रोजी आरपीडी सर्कल ते गोवावेसदरम्यान अशाच प्रकारचा व्हिडीओ शूट करण्यात आला असून यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या सोशल मीडियाच्या नशेने तरुणाईसह अनेकांना वेड लावले आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, टिकटॉकसारख्या प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण कोणत्याही थराला जात आहेत. व्हिडीओ वायरल करण्यासाठी बेळगावमध्ये काही तरुणी रस्त्याच्या मधोमध थेट नृत्य करताना दिसून आल्या आहेत.
बेळगावच्या नेहमीच वर्दळीच्या असणाऱ्या आरपीडी सर्कल ते गोवावेस मार्गावर ७ फेब्रुवारी रोजी अशाच प्रकारचा व्हिडीओ मध्यरात्रीच्या सुमारास शूट करण्यात आला. या दरम्यान मागून वाहने येत असूनही, या तरुणी बेफिकीरपणे नृत्य करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
बेळगाव हे मध्यमवर्गीयांचे शहर आहे. येथे अद्याप मेट्रो सिटीसारख्या ठिकाणी होणाऱ्या विकृत आणि असंस्कृत गोष्टींचा प्रभाव पडलेला नाही. किंबहुना बेळगावकर असे प्रकार खपवून घेत नाहीत. येथील नागरिक संवेदनशील आहेत. यामुळे शहराची प्रतिष्ठा अशा प्रकारांमुळे मलीन होऊ नये यासाठी खबरदारी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
मनोरंजनाचे आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. समाजप्रबोधन, विनोद, जनजागृती यांसारख्या चांगल्या विषयांवर कंटेंट तयार केला जाऊ शकतो. मात्र, व्हायरल होण्याच्या नादात सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीच्या नियमांचा भंग करून, अश्लीलता पसरवून किंवा जीव धोक्यात घालून व्हिडीओ बनवणे पूर्णतः चुकीचे आहे.
सर्वसामान्य नागरिक, पोलीस आणि प्रशासनाने अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, तरुणांनी सोशल मीडियाच्या आहारी न जाता जबाबदारीने वागावे आणि शहराचा लौकिक टिकवावा, अशी अपेक्षा नागरीकातून व्यक्त केली जात आहे.