बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील संगोळी रायण्णा सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांचे थकीत पैसे लवकरात लवकर परत मिळावेत, या मागणीसाठी वकिल एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
ठेवीदारांना न्याय मिळावा म्हणून कायद्यानुसार आदेश दिले गेले असतानाही, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने या प्रकरणात प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
न्यायालयाने आधीच ठेवीदारांचे पैसे परत करण्याचा आदेश दिला आहे. तरीही विशेष अधिकाऱ्यांनी अनेक अर्ज फेटाळले, त्यामुळे ठेवीदारांवर अन्याय होत आहे. संस्था व्यवहारांची कोणतीही नोंद असलेली कागदपत्रे ग्राह्य धरण्याची सुधारित कायद्यातील तरतूद आहे.
त्यामुळे कर्नाटक अपील आणि पुनरावलोकन न्यायाधिकरण न्यायालय बेळगावमध्ये स्थापन करावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. बंगळुरूला जाऊन कागदपत्रे सादर करणे हे अनेक ठेवीदारांना शक्य नाही. काहींनी आधीच मानसिक तणावामुळे जीव गमावले आहेत, तर अनेक ठेवीदार वृद्ध असून त्यांना न्याय मिळायलाच हवा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या वेळी अनेक ठेवीदार, तसेच वरिष्ठ आणि कनिष्ठ वकिल मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.